शिंदेंकडून अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला
मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, महापौर निवडीपर्यंतची सत्ता-समीकरणं अधिकच तापली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं एक महत्त्वाचं पाऊल उचलत ‘हॉटेल पॉलिटिक्स’ सुरू केल्याचं चित्र समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या सर्व निर्वाचित नगरसेवकांना आज दुपारी 3 वाजता वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये हजर राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. महापौर निवडीपर्यंत नगरसेवकांची एकजूट आणि सुरक्षितता राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, याच दिवशी राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे मुंबईत उपस्थित असतानाही, तर अजित पवार पुण्यात असतानाही कॅबिनेट बैठकीला पोहोचले नाहीत. निवडणूक निकालांनंतर झालेल्या पराभवामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याचं बोललं जात असून, त्याचा परिणाम थेट प्रशासकीय कामकाजावरही दिसून येत आहे. एकीकडे महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी सुरू असलेली हॉटेल पॉलिटिक्स आणि दुसरीकडे कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी, यामुळे राज्याच्या राजकारणात नवे संकेत मिळत आहेत.
देशातील सर्वात श्रीमंत आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर अखेर 25 वर्षांनंतर ठाकरे कुटुंबाची एकहाती सत्ता संपुष्टात आली आहे. नऊ वर्षांनंतर झालेल्या या बहुचर्चित निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने जोरदार मुसंडी मारत मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवलं आहे. 227 जागांच्या सभागृहात भाजपने एकट्याने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 29 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे एकूण 118 जागांसह महायुतीने बहुमताचा 114 चा आकडा पार केला असून, आता मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. विशेषतः मुंबईतील सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी महायुतीकडून हालचालींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर एक महत्त्वाचा आणि चर्चेचा निर्णय घेतला आहे. बीएमसीमध्ये महापौर निवड होईपर्यंत शिंदे गटातील तसेच महायुतीतील सर्व विजयी नगरसेवकांना एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी पाचतारांकित हॉटेलचा पर्याय निवडण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. सत्तास्थापनेपर्यंत नगरसेवकांची सुरक्षा आणि एकजूट अबाधित ठेवण्यासाठी हा ‘सिक्युरिटी प्लॅन’ आखण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर सुरू झालेल्या फोडाफोडीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महापौर निवडीपूर्वी राजकीय खेळी आणि दबावतंत्र वापरले जाण्याची शक्यता गृहीत धरूनच शिंदेंनी हा विशेष प्लॅन आखल्याचं बोललं जात आहे. निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये एकत्र ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि कोणत्याही प्रकारची राजकीय उलथापालथ टाळणे, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन हॉटेल’ हा शब्द आता मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, बीएमसीच्या अंतिम निकालांकडे पाहिल्यास महायुतीचा विजय स्पष्टपणे दिसतो. भाजप आणि शिंदे शिवसेनेने मिळून 118 जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला मिळून 72 जागांवर समाधान मानावं लागलं. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 65 जागा जिंकल्या, मनसेला सहा जागा मिळाल्या, तर शरद पवार गटाला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. 1997 पासून सलग 25 वर्षे बीएमसीवर सत्ता गाजवणाऱ्या अविभाजित शिवसेनेचा हा मोठा राजकीय पराभव मानला जात आहे.
इतर पक्षांचाही या निवडणुकीत उल्लेखनीय सहभाग राहिला. काँग्रेसने 24 जागा जिंकल्या, तर एआयएमआयएमने आठ जागांवर विजय मिळवला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळाल्या, तर समाजवादी पक्षाला दोन जागांवर यश आलं. विशेष म्हणजे, नऊ वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवारही विजयी झाले. एकूणच निकाल पाहता मुंबईतील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलल्याचं स्पष्ट होत आहे.
या निवडणुकीत मराठी आणि अमराठी मतदारांमधील मतदानाचा कलही ठळकपणे समोर आला. मराठीबहुल भागांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तुलनेने चांगली साथ मिळाली, तर अमराठी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर भाजपला मतदान केल्याचं निकालातून दिसून आलं. याच पार्श्वभूमीवर मुंबईचा महापौर मराठीच असावा, अशी भूमिका ठाकरे बंधूंनी निवडणूकपूर्व काळात घेतली होती. सुरुवातीला भाजपकडून महापौर हिंदू असावा, अशी भूमिका मांडली जात होती, मात्र नंतर भाजपला मुंबईचा महापौर मराठीच असेल, असं स्पष्ट करावं लागलं. आता महायुतीचा महापौर कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेने 90 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 29 जागांवर विजय मिळवत शिंदे गटाने आपली ताकद सिद्ध केली आहे. भाजपनंतर शिंदे गटाचा स्ट्राईक रेटही लक्षणीय राहिला आहे. त्यामुळे महापौरपदावर भाजपचा नैसर्गिक दावा असला, तरी शिंदे गटही आपली भूमिका ठामपणे मांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही नेत्यांकडून महापौरपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युलाही चर्चेत आणला जात असून, याबाबत अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.

