पुणे- महापालिकेच्या निकाला नंतर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार ठरवलेल्या काहीना राजकारणाचा मार्ग खुला झाल्याचे स्पष्ट झाले आहे . पुण्यात खून प्रकरणी तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि त्यांच्या सासू लक्ष्मी आंदेकर देखील विजयी ठरल्या. दुसरीकडे, जालन्यात गौरी लंकेश हत्येतील आरोपी श्रीकांत पांगारकर, सोलापुरात खून प्रकरणी तुरुंगात असलेल्या संशयित शालन शिंदे यांचा विजयसुद्धा राजकारणाला नवी कलाटणी देणारा ठरला आहे.दुसरीकडे, कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे हिचा देखील निवडणुकीत पराभव झाला. तर सराईत गुन्हेगार म्हटला गेलेला बापू नायर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या निवडणुकीत निवडणूक लढवत होता, त्याचा देखील पराभव झाला आहे.
पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी जामिनावर असलेला आरोपी श्रीकांत पांगारकर याने जालना महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवला आहे. अपक्ष उमेदवार म्हणून लढताना त्याने भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. पांगारकर याने प्रभाग क्रमांक १३ मधून निवडणूक लढवली होती. त्याला २,६६१ मते मिळाली.पुण्यातील प्रभाग क्रमांक २३ मधून सोनाली वनराज आंदेकर यांचा दणदणीत विजय झाला. आयुष कोमकर खून प्रकरणात तुरुंगात असताना त्यांनी निवडणूक लढवली होती. तर याच प्रभागात तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्या त्यांच्या सासू लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांचा देखील कमी फरकाने विजय झाला आहे. मात्र, कारागृहात असलेले बंडू आंदेकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांच्या उमेदवारीभोवती सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. त्यामुळेच त्यांचा विजय झाल्याचे मानले जात आहे. ‘अन्यायाविरुद्ध लढणारी महिला” अशी प्रतिमा मतदारांमध्ये रुजली. त्यांच्या समर्थकांनी प्रभागात घरोघरी जाऊन प्रचार केला.सोनाली आंदेकर यांनी याच प्रभागातून निवडणूक लढणाऱ्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी तथा अनुभवी नेत्या प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा विजय निश्चित मानला जात होता.
सोलापूरचा मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या प्रभाग २ (क) मधील भाजप उमेदवार शालन शिंदे यांचा ६ हजार मताधिक्यांनी विजय झाला आहे. उमेदवारी माघार घेण्यावरून सरवदे यांची हत्या झाली होती. त्यानंतर संशयावरुन शिंदे यांच्यासह १५ जणांना अटक झाली. तेव्हापासून त्या तुरुंगात आहेत.

