वडील तुतारीचे आमदार आणि सून व मुलगा भाजपचा उमेदवार आहेत. अशी ही बनवा बनवी
पुणे- सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पुण्यात चक्क भाजप उमेदवाराचा बाप काढला. मी मोठ्या काकांचा पुतण्या आहे. माझा काका तुझ्या बापापेक्षा खूप मोठा आहे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे दोस्तीत कुस्ती करणाऱ्या भाजप व राष्ट्रवादीतील वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेसाठी येत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी, आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. पुणे महापालिकेचा गड सर करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी आक्रमक रणनीती आखली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज वेगवेगळ्या प्रभागांना भेटी देऊन मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभे राहण्याचे आवाहन करत आहेत. त्यांनी पुण्यात रोड शोही केला. त्यात त्यांनी भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे यांच्यावर वरील शेलक्या शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले, मी शब्दांचा पक्का आहे. उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला कुणाला तरी मत द्यायचे आहे. तुम्ही मागे अनेकांना मतदान केले. पूर्वी ते घड्याळावर निवडून आले. तुम्ही आम्हाला सत्ता द्या. या भागातील टँकर माफियांचे कंबरडे मोडले नाही, तर अजित पवार नाव नाही सांगणार.
अजित पवार यांनी यावेळी भाजपच्या नेत्यांवरही त्यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, गजर कशासाठी वाजतो. माणसांना जागे करण्यासाठी. एकदा घड्याळाचे बटण दाबून बघा मी काय करतो. आम्हाला येथील ड्रग्ज वगैरेचे अवैध धंदे बंद करायचेत. येथील प्रभाग 4 मधील विरोधी उमेदवार टँकर माफिया असल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे. इथे कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही पण काही कच्चे नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला गेले तर आम्हीही सोडणार नाही. मी मोठ्या काकांचा पुतण्या आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका खूप मोठा आहे, असे ते भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे यांना निर्वाणीचा इशारा देताना म्हणाले.
ते पुढे म्हणाले, सुरेंद्र पठारेंचे वडील तुतारीचे आमदार आणि सून व मुलगा भाजपचा उमेदवार आहेत. अशी ही बनवा बनवी सुरू आहे. हे मतदारांना ग्रहित धरत आहेत. आम्ही काय दुधखुळे आहोत का? मी तो शब्द वापरत नाही. पण आम्हाला काय … समजता का? आता म्हणतात विकास करू. एवढे दिवस काय केले? मी चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करणार. आम्ही शरीफ आहोत. कुणाशीही लढत नाही. शरीफ आहोत म्हणून तुमच्यासोबत राज्यात व केंद्रात आहोत. पण आता इथे तुम्ही ठेवलेली माणसे चुकीची आहेत.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली तर मी मेट्रो व पीएमपीएल फुकट करणार आहे. विरोधक दोन्ही बाजूने बोलत आहेत. हा फुकट करायला निघालाय याच्या घरचे आहे का? माझ्या घरचे नाही, तर पालिकेच्या घरचे आहे. रिक्षा चालकांच्या पोटावर पाय येऊ देणार नाही. मी घोषणा केल्यानंतर अनेकांनी कॅबिनेटने निर्णय घेतला का? असा प्रश्न विचारला. हा काय कॅबिनेटने घ्यायचा प्रश्न आहे का? मला काहीतरी अक्कल असेल ना. का उगीच राज्याचा अर्थसंकल्प मांडतो? राष्ट्रवादी काँग्रेस ज्या योजना आणत आहे, त्याचा सर्वांना फायदा होणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

