पुणे.दि.१३: पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला आता मतदार सामोरे जाणार असताना शिवसेना नेत्यांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्याच्या मध्यवर्ती भागातील अनेक प्रभागांतील पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणूक कचेऱ्यांना दि.१२ रोजी, भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदान दिवशी विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, मतदान दिवशी आधी मतदान, मग संक्रांतीचे वाण या धोरणावर भर द्या. मतदारांना वेळेत मतपत्रिका मिळतील याची खात्री करा. लग्नकार्य, समारंभ किंवा बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची आगाऊ नोंद घेऊन त्यांचे मतदान करून घ्या. शिवसैनिकांनी यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
तसेच, शिंदे साहेबांनी पुणेकरांना लिहिलेले पत्रक प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्यावी अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली.
या भेटीदरम्यान शिवसेनेचे प्रकाश ढमढेरे, संदीप शिंदे, अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
यादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी फुलवला चौक येथील आंबा माता आणि कालिका माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि निवडणुकीत शिवसेना पक्षाला घवघवीत यश मिळावे यासाठी देवीकडे प्रार्थना केली.
विविध प्रभागांतील उमेदवारांच्या कचेऱ्यांना भेटी
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी खालील प्रभागांतील शिवसेना उमेदवारांच्या निवडणूक कचेऱ्यांना भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला:
- प्रभाग २३(रविवार पेठ – नाना पेठ): प्रदीप अवचिते, प्रतिभा धंगेकर, डॉ. वैष्णवी किराड, गणेश नलावडे
- प्रभाग २४(कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – के ई एम हॉस्पिटल): प्रदीप अफूवाले, किशोर तरवडे, प्रशांत मते, प्रणव धंगेकर
- प्रभाग २५(शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई): अक्षता धुमाळ, सिद्धेश कामठे
- प्रभाग २६(घोरपडे पेठ – गुरुवार पेठ – समताभुमी): सिद्धेश्वर जाधव, शीतल आंदेकर, वंदना जेधे, आबाजी साकीब
- प्रभाग ३६(सहकारनगर – पद्मावती): मच्छिंद्र ढवळे, पूनम परदेशी, नयना लगस, उल्हास (आबा) बागुल
- प्रभाग ३७(धनकवडी – कात्रज डेअरी): सागर बारणे, सुलक्ष्मी धनकवडे, मोहिनी देवकर, गिरीराज सावंत
- प्रभाग ३८(बालाजीनगर – आंबेगाव – कात्रज): वनिता जांभळे, अनिल कोंढरे, संध्या बर्गे, प्राजक्ता लिपाणे, स्वराज बाबर
पुणे महापालिकेच्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा हा प्रचार दौरा पक्षाला बळ देणारा ठरला आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, जास्तीत जास्त मतदान करून पक्षाला यश मिळवून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

