पुणे -भाजपला आता निवडणुका जिंकण्यासाठी गैरप्रकार आणि भ्रष्टाचार करावा लागत आहे, तसेच दुसऱ्या पक्षातून उमेदवार घ्यावे लागत आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नमूद केले. यामुळेच भाजप आज राज्यातील सर्वात दुबळा पक्ष बनला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पुणे येथे बोलताना सपकाळ यांनी भाजप हा राज्यातील सर्वात दुबळा पक्ष बनल्याचे म्हटले. निवडणूक आयोगाने मतदार यादीत घोळ घातल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.यावेळी काँग्रेस प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार दीप्ती चौधरी, ॲड अभय छाजेड, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, सरचिटणीस प्राची दुधाने उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले की, २८८ विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मतदार यादीत घोळ असल्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले होते. दुबार नावे शोधून एकाच ठिकाणी मतदान करण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. मनपा निवडणुकीतही निवडणूक आयोगाने मतदार यादीत घोळ घातला असून, यावर त्यांचा कोणताही धाक नसल्याचे सपकाळ यांनी म्हटले. प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रभाग रचनेत गैरप्रकार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपवर दररोज टीका करतात, तरीही ते सत्तेत भाजपसोबत आहेत, यावर सपकाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांचे हे वागणे योग्य नसल्याचे काँग्रेसची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लाचार असून, अजित पवार भ्रष्टाचाराचे आरोप करत असतानाही त्यांचा राजीनामा घेत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘नूरा कुस्ती’ खेळत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.
सपकाळ यांनी मुंढवा जमीन प्रकरणात अप्रत्यक्ष भ्रष्टाचार झाल्याचा आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात गैरप्रकार केल्याचा आरोप केला. अजित पवार भ्रष्टाचाराचे समर्थन करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
पुण्यातील राजकारणी स्वार्थासाठी भूमिका बदलत असल्याचा आरोप करत, पुणे शहर आता विद्येचे माहेरघर किंवा सांस्कृतिक शहर न राहता ‘ड्रग शहर’ आणि ‘कोयता शहर’ बनले आहे, असे सपकाळ म्हणाले. सत्तेचे सौदागर शहर विकत घेण्यास लागले असून, शहराला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडी म्हणून एकत्र येण्याचा प्रयत्न झाला, पण तो प्रत्यक्षात येऊ शकला नाही. काँग्रेसने अजित पवार यांच्या पक्षासोबत कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्यामुळे आघाडी होऊ शकली नाही. सध्या शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांच्यात युती झाली असून, एकत्रित प्रचार सुरू असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

