जे स्वतःच्या काकाचे झाले नाहीत ते पिंपरी चिंचवडचे होतील का?
पिंपरी-अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका असून आधी त्यांनी स्वतःच्या मुलाचा पराक्रम पाहावा आणि नंतर आमच्यावर टीका करावी, असा टोला भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी लगावला आहे. तसेच अजित पवार हे स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपसोबत आले आहेत, त्यांनी आम्हाला शिकवू नये, अशी खरमरीत टीका लांडगे यांनी केली आहे. अजित पवारांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर लांडगे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर दिले आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले, आधी स्वतःच्या लोकांचे पराक्रम पाहा आणि ते स्वतः आका आहेत, हे त्यांनी जाहीर करावे. ते मला पिंपरी चिंचवडचा आका म्हणत आहेत, मुळात अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे.
पुढे बोलताना महेश लांडगे म्हणाले, सध्या अजित पवारांचा अहंकार बोलत आहे, ते नैराश्यात आहेत. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आलेल्या अजित पवारांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू नयेत. तसेच आमच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करायचे असतील तर मी, पालिका प्रशासन आणि अजितदादांनी सामोरासमोर बसावे, मग सर्व उत्तर मिळतील, असे आवाहन लांडगे यांनी केले आहे.
आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेला तसेच आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत, ते पिंपरी चिंचवडचे होतील का? असा सवाल उपस्थित करत लांडगे यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

