पुणे-बाणेर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचार सभेसाठी पैसे वाटप करून गर्दी जमवण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांच्यावरही त्यांनी अनेक आरोप केले.भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत लहू बालवडकर आणि गणेश कळमकर यांनी हे मत व्यक्त केले. प्रभाग क्र. ९ चे भाजपचे अधिकृत उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर यांच्यासह पदाधिकारी प्रकाश बालवडकर, प्रल्हाद सायकर आणि राहुल कोकाटे यावेळी उपस्थित होते. अमोल बालवडकर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर केलेल्या आरोपांची पोलखोल करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
लहू बालवडकर यांनी अमोल बालवडकर यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी हवी होती. २०१७ मध्ये भाजपने त्यांना मनपा नगरसेवक पदाची संधी दिली, मात्र त्यानंतर त्यांची महत्त्वाकांक्षा वाढली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात ते पदाच्या लोभापोटी होते, असा दावा बालवडकर यांनी केला.
बाणेरमध्ये स्मार्ट सिटीचे २१ प्रकल्प पूर्ण झाले आहेत, असेही बालवडकर यांनी नमूद केले. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून, चौकटीत राहून काम करावे लागते. भाजपचे मालक होण्याचा प्रयत्न करून हुकूमशाही पद्धत अवलंबल्याचा आरोप त्यांनी अमोल बालवडकर यांच्यावर केला. पद मिळाल्यावर काय काम केले, हे जनतेला सांगणे महत्त्वाचे असते, असेही ते म्हणाले.
प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपकडून एकूण ४७ जण उमेदवारीसाठी इच्छुक होते. अमोल बालवडकर यांची उमेदवारी दीड तास आधी रद्द झाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांची उमेदवारी मुदतपूर्व अर्धा तास आधीच रद्द झाली, तो अन्याय नव्हता का, असा प्रतिप्रश्न बालवडकर यांनी केला.
पक्षाने उमेदवारीसाठी अर्ज मागवून घेतले होते आणि ४७ पैकी चार जणांना उमेदवारी दिली गेली. अमोल बालवडकर हे प्रभागात इतर तीन उमेदवार मीच ठरवणार आणि भाजप सत्तेत आल्यावर मलाच महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपद दिले पाहिजे, असे सांगत होते. त्यामुळे पक्षाने ऐनवेळी निर्णय घेतला, असे बालवडकर यांनी स्पष्ट केले.
पक्षाची शिस्त न पाळल्याने पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय दिला आहे, असे लहू बालवडकर म्हणाले. भाजप विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे, तर अमोल बालवडकर सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक निवडणूक लढवत आहेत. मागील दीड वर्षांपासून ते पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमास उपस्थित नव्हते, असेही त्यांनी सांगितले.

