पुणे, ता. ६ :पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, शिवसेनेने पुण्यात पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात आयोजित विशेष पत्रकार परिषदेत शिवसेनेची निवडणूक रणनीती, प्रचाराची दिशा आणि राजकीय भूमिका स्पष्टपणे मांडली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात राज्यातील मंत्री, आमदार आणि वरिष्ठ नेते तळ ठोकणार असून, प्रत्येक प्रभागात थेट जनसंपर्कावर विशेष भर देण्यात येणार आहे. कोपरा बैठका, जाहीर सभा, घरभेटी आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखणी करण्यात आली आहे.
या निवडणुकीत प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही लोकाभिमुख योजना असणार असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. पुण्यातील महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने, महिला पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात लाभार्थी महिलांशी थेट संवाद साधला जाणार आहे. विकासकामांसोबतच कल्याणकारी योजनांच्या जोरावर सरकारचे काम घराघरात पोहोचवण्यावर शिवसेनेचा भर राहणार आहे.
या प्रचार मोहिमेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, भरत गोगावले, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव,खासदार श्रीकांत शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, तसेच गृह राज्यमंत्री योगेश कदम,आमदार विजय शिवतारे, शहाजीबापू पाटील, आ.निलेश राणे, शरद सोनवणे, ज्ञानराज चौगुले, चंद्रदीप नरके यांच्यासह राज्यातील महिला पदाधिकारी सक्रियपणे सहभागी होणार आहेत. पुण्यातील विविध प्रभागांमध्ये मंत्री आणि आमदार प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार करणार असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं.
ज्या प्रभागांमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक आहे, त्या ठिकाणी सक्षम, जनाधार असलेले आणि लाडक्या बहिणींच्या प्रचारात काम केलेल्या अनुभवी पदाधिकारी, प्रभावी उमेदवार देण्यात आले असून, पुणे महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा मोठ्या ताकदीने फडकवणे हेच महायुतीचे अंतिम ध्येय असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठामपणे सांगितले.
“पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’सारख्या लोकाभिमुख योजनांमुळे महिलांमध्ये सरकारबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. विकास, संवेदनशीलता आणि जनतेशी थेट संवाद या बळावर पुण्यात शिवसेनेचा भगवा निश्चितच फडकणार.”
….डॉ. नीलम गोऱ्हे
विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या

