पुणे-राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे भाजपनेते आक्रमक झाले आहेत. आम्ही मागची पाने चाळली तर दादांना बोलता येणार नाही. तसेच 70 हजार कोटींचा निकाल अद्याप लागलेला नाही, अशा कडक शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना थेट इशारा दिला आहे.
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन प्रमुख पक्षांत ‘तू-तू मैं-मैं’ सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील एका पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधताना, माझ्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, हे सर्वांना माहित आहे. मात्र, ज्यांनी हे आरोप केले त्यांच्यासोबतच मी आज सरकारमध्ये बसलो आहे. असे म्हटले होते. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे भाजपची काहीशी कोंडी झाली होती. या विधानानंतर भाजपच्या गोटातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे.
अजित पवारांच्या विधानाचा समाचार घेताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. “70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा काही अभिमानास्पद नाही. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि अद्याप निकाल लागलेला नाही. त्यामुळे न्यायालयात काय होईल, त्यावर पुढची दिशा ठरेल. अजित दादा हे प्रगल्भ नेते आहेत, त्यांनी एका महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीत मनभेद निर्माण होतील असे वागू नये,” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना जुन्या प्रकरणांची आठवण करून देत थेट इशारा दिला आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकमेकांविरुद्ध न बोलण्याचे ठरले असतानाही अजित पवार असे का बोलले? याची मला कल्पना नाही. पण त्यांनी असे बोलायला नको होते, असे बावनकुळेंनी म्हटले. मी त्यांना सल्ला देण्याइतका मोठा नाही, पण पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार अनेक वर्षे सत्तेत होते. आम्ही जर आता त्यांची मागची पानं चाळली, तर त्यांना काही बोलता येणार नाही. मात्र, आमची जुनी पानं उलटण्याची इच्छा नाही. त्यामुळे त्यांनी समन्वय समितीच्या नियमांचे पालन करावे, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

