पुणे : वरिष्ठ पत्रकार असिम शेख यांचे दीर्घ आजाराने सोमवारी सकाळी निधन झाले़ ते ५५ वर्षांचे होते. टाईम्स ऑफ इंडियामध्ये ते सहायक संपादक म्हणून कार्यरत होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते आजारी होते.
असिम शेख यांनी सुरुवातीपासून इंग्रजी दैनिकांमध्ये पत्रकारिता केली. क्राईम, कोर्टमधील बातम्यांमध्ये त्यांनी अनेक वर्षे बातमीदारी केली. कागदपत्रे पाहून त्याचा अभ्यास करुन त्यानंतर सखोल बातमी देण्यात असिम शेख यांचा हातखंडा होता. कॅम्प परिसरातील अनेक समस्यांवर त्यांनी वेळोवेळी प्रकाश टाकला होता.असिम शेख यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी कॅम्प येथील तंडेल मस्जिद येथे नमाज ए जनाजा अदा करण्यात येणार आहे. त्यानंतर जवळच असलेल्या साचापीर मुस्लिम कब्रस्तान येथे दफनविधी पार पडणार आहे.

