श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट, बटाट्या मारुती ट्रस्ट आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : ढोल-ताशांचा गजर… रांगोळी, मंदिराला तोरण… पारंपरिक वेशात महिला पुरुष मुले… आणि पुष्पवृष्टी करीत ग्राम प्रदक्षिणा व ग्राम गुढीची उभारणी ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात करण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि रामनामाच्या गजरात संपूर्ण परिसर राममय झाला होता.
श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, बटाट्या मारुती ट्रस्ट आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार वाड्यावरील बटाट्या मारुती मंदिर येथे ग्रामप्रदक्षिणा व ग्रामगुढी उभारण्यात आली. यावेळी पुणे इस्कॉनचे अनंत गोपदास, रा.स्व. संघ पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कसबा विभाग कार्यवाह राहुल पुंडे, रोटरी क्लब पुणे चे अध्यक्ष नरेंद्र पालसिंह बक्षी, श्रीराम पथकाचे विलास शिगवण, महेश शेठ, राहुल बोरा, नचिकेत फडके, देवेंद्र आठवले, अश्विनी देवळणकर, बटाट्या मारुती ट्रस्टचे योगेश समेळ, संजय पांडे यावेळी उपस्थित होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत नागरिकांना कृत्रिम हत्तीवरून साखर वाटण्यात आली.
पुणे इस्कॉनचे अनंत गोपदास म्हणाले, आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाणार आहे. या राष्ट्राचे दोन आत्मे आहेत प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण. जगावे ते श्रीरामासारखे आणि युद्धनीतीचा अवलंब करावा तो श्रीकृष्णासारखा. व्यक्तिगत जीवनात रामाप्रमाणे आणि समाज जीवनात कृष्णाप्रमाणे जगलो, तर भारत देश जगावर राज्य करेल. आज रामलल्ला हम आएंगे, मंदिर वहीं बनाएंगे’ हा नारा आपण पूर्ण केला परंतु अयोध्या तो बस झांकी है, काशी मथुरा बाकी है… हा नारा अजून पूर्ण करायचा आहे हे विसरू नका.
रवींद्र वंजारवाडकर म्हणाले, प्रभू श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा अयोध्येला आले तेव्हा गुढ्या उभारून दाराला तोरण लावून त्यांचे स्वागत झाले. ती गुढी आज आपण ऐतिहासिक शनिवार वाडा येथे उभी केली आहे. ही गुढी म्हणजे श्रीरामांच्या अयोध्या आगमनाची आहे तशीच ती त्यांच्या प्राणप्रतिष्ठेची देखील आहे. ही प्राणप्रतिष्ठा म्हणजे श्रीरामांच्या आदर्शाची आपल्या मनामध्ये उभारणार आहे. प्रभू श्रीराम म्हणजे आपल्या देशाच्या अस्मितेचे, गौरवाचे प्रतीक, राष्ट्र मंदिराच्या प्राणाचे प्रतीक आहे. आज प्रभू श्रीरामांच्या आदर्शाची प्राणप्रतिष्ठा देशात नव्हे तर जगात लक्ष लक्ष ठिकाणी होत आहे. प्रभू श्रीरामांचे जीवन मूल्य जगण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे, असे ही त्यांनी सांगितले.