जालना -वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयं सेवक संघावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत संघाला उद्देशून तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. आरएसएस रजिस्टर्ड संस्था आहे का? नसेल, तर इतके फंडिंग कसे काय मिळत आहे? तसेच संघाने भारतीय तिरंगा स्वीकारला नव्हता, हे खरे आहे की खोटे? असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत म्हटले की, इकडची तिकडची बकवास बंद करा आणि माझ्या तीन प्रश्नांचे उत्तर द्या. आरएसएस ही नोंदणीकृत संघटना आहे का? जर ती नोंदणीकृत नसेल, तर तिला कोट्यवधी रुपयांचा निधी कसा मिळत आहे? हे खरे नाही का की आरएसएसने भारतीय ध्वज स्वीकारला नाही? हे खरे नाही का की आरएसएसने अनेक दशकांपासून नागपूर येथील मुख्यालयात तिरंगा फडकवला नाही? हे खरे नाही का की गोळवलकर आणि सावरकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले समतावादी, लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष संविधान नाकारले आणि मनुस्मृतीला संविधान बनवण्याची मागणी केली? असे प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केले आहेत.
वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आता आरएसएस आणि मनुवादी शक्तींना तोंड देण्यासाठी एकत्र आले आहेत. तुम्ही आणि तुमच्या अर्ध्या अंतर्वस्त्रांच्या टोळीने एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, आपला देश मनुस्मृतीने नव्हे तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने चालेल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आज प्रकाश आंबेडकर यांची जालना येथे जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. आज धर्म नव्हे तर ओबीसी धोक्यात आहेत. ओबीसी सत्ताधारी झाल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही. ओबीसींच्या राजकीय लढ्याला सुरुवात झाली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. जालना येथे जाहीर सभेत ते बोलते होते. जरांगे मुंबईत ठिय्या मांडून बसले आणि कॉंग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे 190 आमदार जरांगेंच्या दर्शनाला गेले. हेच आमदार देवेंद्र फडणवीस यांना भेरले तशी फडणवीस यांची भाषा बदलली, अशी टीका आंबेडकरांनी केली आहे.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, जे आमदार जरांगे यांना भेटले तेच आमदार जरांगे काय म्हणतात ते ऐकण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सल्ला दिला आणि कुणबी प्रमाणपत्राचा जीआर निघाल, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हा जीआर रद्द करणार आहेत का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर म्हणाले, ओबीसींनी मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार जाहीर केले पाहिजेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये एक तरी ओबीसी मतदार असायला हवा. काही मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव आहेत. काही मतदारसंघ एसटीसाठी राखीव आहेत. एसी आणि एसटी हा वर्ग आरक्षणवादी आहे. हे लक्षात घ्यायला हवे. जे लोक आरक्षणवादी आहेत, त्यांनाच मतदान करायला हवे. आपल मत हे ओबीसीला, आपले मत हे एसटीला असायला हवे, असे आवाहन आंबेडकरांनी केले आहे.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, धर्म नाही तर ओबीसी संकटात आला आहे. ओबीसी सत्ताधारी झाल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही. ओबीसी नेत्यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये आहेत. कळसूत्री बाहुल्याप्रमाणे हे ओबीसी नेते नाचवले जात आहेत, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींनी राजकारणात उतरावे, असेही आवाहन केले आहे.

