पुणे:महापालिकेने मिळकत थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. जुन्या हद्दीसह समाविष्ट गावांतील सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी दंडाच्या रकमेत ७५ टक्के सूट देण्यात येणार असून १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी पर्यंत ही योजना राबवण्यात येणार आहे. यापूर्वी अभय योजनेचा लाभ घेतलेल्या मिळकतधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
या योजनेसाठी ४ लाख ९७ हजार १७२ मिळकत धारक पात्र ठरणार आहेत. त्यांच्याकडून मूळ कराची रक्कम ३ हजार १५८ कोटी रुपये येणे असून दंडाची रक्कम ९ हजार २ कोटी रुपये आहे. सर्वांनी या योजनेचा लाभ घेतल्यास साधारण साडेपाच हजार कोटी रुपये मिळणार आहेत.मागील योजनेत लाभ घेतलेल्या १ लाख ४० हजार ४३७ मिळकत धारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांच्याकडे सध्या ९०० कोटी रुपये थकबाकी आहे. त्यांच्या मिळकतीवर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त राम यांनी सांगितले.

