पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दलाच्या वतीने दि.१९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अभ्यासक डॉ.संग्राम पाटील (इंग्लंड)यांचे ‘कोरोना आणि मोदी सरकार’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गांधी भवन सभागृह,कोथरूड येथे झालेल्या या व्याख्यानालाडॉ कुमार सप्तर्षी,डॉ. उर्मिला सप्तर्षी, प्रशांत कोठडिया, जांबुवंत मनोहर, मुकुंद बहाळकर,सुदर्शन चखाले , संदीप बर्वे,अंजुम इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. संग्राम पाटील म्हणाले, ‘ कोविड काळात माणुसकीचे दर्शन भारतात घडले. या काळातील चुकांपासून धडे शिकले पाहिजे. आपण स्वतःला विश्व गुरू मानत असलो तरी शिकण्याची प्रवृत्ती सोडता कामा नये.
कोविडच्या सुरुवातीच्या टप्प्यात भारत सरकार गंभीर नव्हते.बळींच्या आकडया बाबत भारत सरकार खोटे बोलत आहेत.५ लाख मृतांऐवजी ४०-५० लाख आकडा असणार आहे. आपण व्हॅक्सीन गुरु आहोत, असा चुकीचा प्रचार झाल्याने आपल्या कामगिरीवर आत्मपरीक्षण होत नाही. वैज्ञानिक मनोभूमिका नसल्याने छद्म विज्ञान प्रसारित केले जात होते.आयुर्वेद, युनानीचे उत्पादने , गाईचे शेण, मूत्र , आर्सेनिक यांना पुढे आणले गेले. ऑक्सीजन न मिळाल्याने रुग्ण दगावणे हे वैद्यकीय व्यवस्थेचे अपयश होते. डॉक्टर, नर्स यांनी चांगले काम केले.
महाराष्ट्राचे राज्यपाल मंदिर उघडण्याचा दबाव आणत होते. कोविड चे नियम उल्लंघन सर्वात जास्त नरेंद्र मोदीनी केले. राज्यांना पैसे देण्यात केंद्र सरकार खळखळ करीत होते. कोवीडला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. थाळी वाजवणे,टाळया वाजवणे, गर्दी करणे असा उथळपणा फक्त भारतातच केला गेला.
कोरोना काळात रामलल्ला अस्थायी मंदिरात आणण्याचा किस्सा राहुल सोलापूरकरांनी सांगितल्याचा संदर्भ देऊन टीका करताना डॉ. पाटील म्हणाले, ‘ मृत्यू तांडव सुरू असताना सत्ताधारी फक्त धार्मिक प्रसार,सभा, राजकारण, फोडाफोडी , उथळपणा, दुजाभाव असे सर्व प्रकार करत होते. शिवाय पीएम फंड सारखा खासगी निधी उभा करण्यात आला. खासदार देखील चोरून विमानातून रेमडेसीव्हर आणत होते.म्युकर मायकॉसिस फक्त भारतातच झाला. कारण स्टिरॉईडचा मारा करण्यात आला होता.
कोरोना काळात भारतात सर्वात जास्त गैर व्यवस्थापन झाले.याबद्दल कोणी बोलत नाही. माध्यमात लिहून येत नाही. सज्जनांचे मौन जास्त धोकादायक ठरले आहे. अजूनही अपयश लपवण्यासाठी बॅनरबाजी केली जात आहे.
शनिवार,दि.२० जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता माजी पोलीस अधिकारी विवेक देशपांडे यांचे ‘दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा’ विषयावर व्याख्यान होणार आहे. गांधी भवन सभागृह,कोथरूड येथे हे व्याख्यान होणार आहे.