मुंबई- आज मतदार याद्यांमधील घोळ, मतचोरी आणि दुबार नावे या गंभीर मुद्द्यांवरून उसळलेल्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर सत्याचा मोर्चा निघाला. महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात हे आंदोलन छेडले. हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी फॅशन स्ट्रीटपासून मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत रॅली काढली. मतदार नोंदणी प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आणि पारदर्शक निवडणुकीच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या ऐतिहासिक मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि मनसेचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा संदेश गेला आहे.

मोर्चातील मार्गदर्शनपर भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकशाहीच्या रक्षणाचा मुद्दा पुढे करत कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश दिला. देशाची लोकशाही टिकवण्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही सर्व बंधू-भगिनी, तुमचा हा संघर्ष मला इतिहासाची आठवण करून देतो, असं सांगत त्यांनी या आंदोलनाला ऐतिहासिक संदर्भ जोडला. पवार म्हणाले की, आजचा मोर्चा मला 1978-89 च्या काळात घेऊन जातो. त्या काळात मी महाविद्यालयात शिकत होतो. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी काळा घोडा परिसरात असेच मोर्चे निघाले होते. त्या काळातील एकजूट आणि विचारांचा समन्वय आज तुमच्यात दिसत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आजचा मोर्चा हा कोणत्याही पक्षासाठी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न नसून लोकशाही रचनेच्या रक्षणासाठीचा सामूहिक आवाज आहे. आपण स्वतःसाठी काही मागत नाही, सत्ता किंवा पदासाठीही नाही. आपण फक्त एवढंच म्हणतोय की संविधानाने दिलेले मतदानाचे अधिकार सुरक्षित राहिले पाहिजेत, असं ते म्हणाले. निवडणूक आयोगावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, संविधानात सांगितलेले नियम सत्ताधाऱ्यांच्या मनाप्रमाणे वाकवले गेले तर लोकशाहीचं भविष्य धोक्यात येईल. त्यामुळे, जनतेने सावध राहून निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी दबाव निर्माण करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं.
मोर्चाच्या अखेरीस शरद पवारांनी सर्व कार्यकर्त्यांना शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देण्याचं आवाहन केलं. ही लढाई कुणा एका पक्षाची नाही, ही लढाई संविधान आणि लोकशाही वाचवण्याची आहे, असा ठाम संदेश त्यांनी दिला. सत्याचा मोर्चा हा फक्त विरोधाचा नव्हे, तर जागृतीचा आणि जबाबदारीचा आवाज असल्याचं ते म्हणाले. या मोर्चातून राज्यभरात लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला असून, निवडणूक आयोगावर दबाव वाढवण्यात महाविकास आघाडी आणि मनसेला यश मिळाल्याचं म्हटलं जात आहे.
खोटेपणा सिद्ध करणाऱ्यांवरच गुन्हे दाखल
शरद पवार म्हणाले की, काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या. काही ठिकाणी सांगण्यात आलं की इथे बनावट आधार कार्ड मिळते. सिद्ध करून द्या हे आव्हान आले. डेमो दाखवला आणि हा आरोप ज्याने केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला. खोटारडे आहेत हे सांगण्याचा, सिद्ध करण्याचा जर प्रयत्न कोणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. याचा अर्थ हे शासन सगळ्याला संरक्षण देते. त्यामुळे तुमची आणि माझी जबाबदारी आहे, काही करा पण मतदानाची चोरी आम्ही थांबवणार. आपण स्वत:साठी काही मागत नाही. आपण ऐवढंच म्हणतो की लोकशाहीमध्ये सविधानानं जो अधिकार तुम्हा आम्हाला दिला त्याचे जतन करा. त्याची आज वेळ आली आहे. आपण बघितलं निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषत: विधानसभेच्या निवडणुकीत जे प्रकार झाले. त्यामध्ये सामान्य माणसाचा संसदीय लोकशाही यावरचा विश्वासाला धक्का बसला. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत.
लोकशाही टिकवण्यासाठी काय पडेल ती किंमत मोजू पण…
याठिकाणी उत्तमराव जानकर सोलापूरचे आमदार आहेत. त्यांनी त्यांचा अनुभव तुमच्यासमोर सांगितला. त्यातून स्पष्ट होतं की सत्तेचा गैरवापर सातत्याने केला जातो. यांना तोंड द्यावे लागेल. राजकीय मतभेद असू शकतात. निवडणुकीत संघर्ष असू शकतो. पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल. आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा जतन करणं हेच आमचं कर्तव्य आहे. हा दृष्टिकोन ठेवून आपण या ठिकाणी निर्धार केला पाहिजे. देशाची लोकशाही टिकवायची असेल. मताचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला आम्हाला एक व्हावं लागेल. मी तुम्हाला खात्री देतो. आज व्यासपीठावर असलेले सर्व नेते, सहकारी सगळ्यांच्या वतीने निर्णय घेतला काय पडेल ती किंमत मोजू पण ही चोरी थांबवू आणि या देशाची लोकशाही टिकेल कशी याची खबरदारी घेऊ.

