मुंबई-भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला हादरा देणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाभा अणु संशोधन केंद्राचा बनावट शास्त्रज्ञ असल्याचा बनाव करणाऱ्या अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद या इसमाला मुंबई गुन्हे शाखेने राष्ट्रीय तपास संस्था आणि गुप्तचर विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अटक केली आहे.प्राथमिक तपासात या व्यक्तीने स्वतःला BARC मधील वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ असल्याचे भासवून विविध ठिकाणी दिशाभूल करणारी कागदपत्रे आणि बनावट ओळखपत्रांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, तपास यंत्रणांना त्याच्या निवासस्थानातून अणुबॉम्ब डिझाइनशी संबंधित 14 अत्यंत संवेदनशील नकाशे आणि अनेक गुप्त कागदपत्रे सापडली आहेत. या घटनेनंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या पातळीवर प्रचंड खळबळ माजली असून, अख्तर हुसेनचा उद्देश नेमका काय होता, हे उलगडण्यासाठी केंद्र आणि राज्य यंत्रणा उच्चस्तरीय तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेला काही काळापासून एका संशयास्पद व्यक्तीच्या हालचालींबाबत माहिती मिळत होती, जो स्वतःला BARC मधील वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत होता. त्याच्या हालचालींवर नजर ठेवून कारवाई करताना पोलिसांनी अख्तर हुसेनला अटक केली. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर चौकशीतून मिळालेल्या माहितीने तपास यंत्रणेला धक्काच बसला. घरातून सापडलेल्या कागदपत्रांमध्ये अणुबॉम्ब तयार करण्याच्या आराखड्याशी साधर्म्य असलेले नकाशे, तांत्रिक टिपा आणि इतर दस्तऐवज होते.
प्राथमिक तपासात हे नकाशे देशांतर्गत तयार केलेले नाहीत, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा धागा परदेशी गुप्तचर नेटवर्कशी जोडला गेला असण्याची शंका व्यक्त केली जात आहे. अख्तर हुसेनकडे हे नकाशे कसे आले, त्यामागे कोणाचा हात आहे आणि या माध्यमातून घातपाताचा कट तर रचला नव्हता ना, याची चौकशी सध्या केंद्रस्थानी आहे.
या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA आणि गुप्तचर विभाग म्हणजेच IB यांनी आपल्या हाती घेतला असून, अनेक दिशांनी चौकशी सुरू आहे. अख्तर हुसेनने मागील काही वर्षांपासून भाभा अणु संशोधन केंद्राच्या नावाचा वापर करून अनेकांना फसवल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्याच्या सोशल मीडियावरील काही संपर्कांचा तपास घेतला असता काही परदेशी नागरिकांशी त्याचे संवाद असल्याचे आढळले आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर पैलू दडलेले असावेत, अशी शंका वर्तवली जात आहे. तपास यंत्रणांनी अख्तर हुसेनकडून मिळालेल्या संगणक, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी सुरू केली असून, या उपकरणांतून अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाशी संबंधित आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यात येईल, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर भाभा अणु संशोधन केंद्राच्या सुरक्षा यंत्रणांमध्येही हालचाल सुरू झाली आहे. देशातील सर्व अणु संशोधन केंद्रे आणि संवेदनशील प्रयोगशाळांमध्ये सुरक्षेची पातळी वाढवण्यात आली आहे. भारताच्या अणु कार्यक्रमाच्या सुरक्षिततेबाबत देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच सजगता बाळगली जाते. भाभा अणु संशोधन केंद्र हे भारताच्या अणु ऊर्जा आणि संशोधन क्षेत्राचे केंद्रबिंदू मानले जाते. मुंबईतील ट्रॉम्बे येथे असलेले हे केंद्र अणुशक्ती निर्मिती, अणु भौतिकशास्त्र, रेडिओआयसोटोप्स उत्पादन, वैद्यकीय संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात उपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या कामात अग्रस्थानी आहे. त्यामुळे या संस्थेच्या नावाचा गैरवापर करून बनावट ओळख निर्माण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला देशद्रोहाच्या तरतुदींनुसार कठोर शिक्षा होऊ शकते.
भाभा अणु संशोधन केंद्राचा इतिहासही या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आला आहे. प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी 1954 मध्ये अॅटॉमिक एनर्जी इस्टॅब्लिशमेंट, ट्रॉम्बे या नावाने या संस्थेची स्थापना केली. भारताच्या अणु संशोधनाला स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांच्या निधनानंतर 1967 मध्ये या संस्थेचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र करण्यात आले. आज या संस्थेमुळे भारत अणुऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनला आहे. अशा संस्थेच्या नावाशी जोडलेला हा बनावटपणा केवळ गुन्हा नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेला धक्का देणारा गंभीर कट असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यात असून, पुढील काही दिवसांत देश हादरवणारी नवी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

