पुणे :– अनधिकृत बांधकामांवर पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. अहिरेगाव परिसरात एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे मनपाच्या बांधकाम विकास विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी विठ्ठल वांजळे, एस.व्ही. वांजळे, अविनाश निवृत्ती मोहोळ, ओंकार झारी, रोहन वांजळे, शकुंतला विठ्ठल वांजळे, मानसी गणेश वांजळे, साधना कालिदास वांजळे, मालन तुकाराम वांजळे व इतरांवर आयपीसी 353, 341, 143, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार अहिरेगाव येथे बुधवारी (दि.17) सकाळी साडे अकरा ते दुपारी दोनच्या दरम्यान घडला आहे.एकूण 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शाखा अभियंता दत्तात्रय निवृत्ती जगताप (वय-55 रा. मोहननगर, धनकवडी, पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय जगताप हे पुणे महानगरपालिका येथे बांधकाम विकास विभागाच्या झोन तीनमध्ये शाखा अभियंता म्हणून काम करतात. जगताप यांच्या विभागाकडून नवीन बांधकाम मंजुरी, निष्कासन अशी कामे केली जातात. आरोपींनी अहिरेगाव येथील सर्व्हे नं. 76/87 पैकी प्लॉट नं. 103 येथे अनधिकृत नवीन इमारतीचे बांधकाम सुरु केले आहे. याबाबत आरोपींना नोटीस देण्यात आली होती. मात्र, आरोपींनी नोटीस स्वीकारली नाही.
यामुळे आरोपींकडून सुरु असलेल्या अनधिकृत बांधकाम इमारतीवर कारवाई करण्यासाठी फिर्यादी व त्यांचे सहकारी तसेच पोलीस स्टाफ बुधवारी अहिरेगाव येथे गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्याकडे असलेल्या चारचाकी गाड्या रस्त्यात अडव्या लावून रस्ता बंद केला. तसेच गैरकायद्याची मंडळी जमा करुन रस्ता अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी व इतरांना धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

