आयोजक, प्रायोजक आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याचे झाले चीज
पुणे- सरकारने दिले अनुदान ४ कोटी अन राजधानी दिल्ली येथे मराठी साहित्य संमेलन संपन्न केले साडेतीन कोटीत – हे सारे आपले सहयोगी संयोजक,आयोजक,प्रायोजक आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याचे आणि घेतलेल्या श्रमाचे एक आनादाद्यी फळ आहे असे येथे सरहद चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय नहार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी संमेलनाचे समन्वयक डॉ. शैलेश पगारिया,संयोजक लेशपाल जवळगे उपस्थित होते
ते म्हणाले,’दिल्लीत पार पडलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा खर्चाचा ताळेबंद आपल्या समोर ठेवताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. या संमेलनासाठी मिळालेली देणगी अथवा मदत महाराष्ट्रातील जनतेची असल्याने त्याबद्दल पारदर्शकपणे जमाखर्च देणे हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो. या संमेलनाचे आयोजन करण्याच्या घोषणेपासून दिल्लीतील संमेलन मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीची कक्षा विस्तारणारी असावे असे प्रयत्न संयोजक म्हणून आम्ही केले. या संमेलनासाठी झालेला एकूण खर्च 3 कोटी 49 लाख 56,400 रूपये इतका झालेला आहे. जीएसटी आणि टीडीएस यामुळे या जमाखर्चास थोडा वेळ लागला. यामध्ये आणखी थोडी रक्कम वाढण्याची शक्यता आहे मात्र एकूण खर्च 3 कोटी 50 ते 51 लाख रूपये इतका आहे. या खर्चात रेल्वेसहचा प्रवास खर्च, प्रत्यक्ष कार्यक्रमांचा खर्च, मानधन आणि छपाई जाहिरातसह इतर खर्च समाविष्ट आहेत. रेल्वेतील जेवण तसेच व्यवस्थांचे खर्च मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी उचलले तर दिल्लीमधील भोजन व्यवस्थेपैकी अंदाजे 70 टक्के भाग भारती विद्यापीठाने उचलला. महामंडळाने संस्थेस 2 कोटी सत्तर लक्ष रूपये दिले असून सभासद नोंदणी व स्टॉल बुकींग मधून 23 लक्ष 98, 568 रूपये जमा झालेले आहे. 1 लक्ष रूपये नागपूरच्या गिरीश गांधी यांच्या संस्थेकडून संमेलनासाठी आलेले आहेत ते वगळता संस्थेस संमेलनाच्या निमित्ताने केवळ स्वागताध्याक्ष यांच्या विद्याप्रतिष्ठाण कडून 35 लक्ष रूपये व 15 लक्ष रूपयांचे इतर खर्च अशी देणगी आणि पी. डी पाटील यांच्या संस्थेकडून 50 लक्ष रूपयाची प्रायोजकता मिळाली होती (यापैकी 43 लक्ष 10,345 रूपये जमा झाले) महाराष्ट्र शासनाने या संमेलनासाठी प्रथम 2 कोटी आणि अधिकचे 2 कोटी महामंडळाला संमेलनासाठी दिले. (10 टक्के रक्कम प्रशासकीय कामासाठी महामंडळाला ठेवली जाते.) संस्थेकडून जास्तीत जास्त बचत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात अनेकांनी ठरल्यापेक्षाही कमी मानधन घेतले तर दिल्लीतील कार्यक्रमाचे आयोजन करणार्या कंपनीकडून अक्षम्य चूका झाल्याने त्यांना ठरलेल्या रकमेपेक्षा महामंडळाच्या परवानगीने कमी रक्कम देण्यात आली. एकूण या संमेलनाच्या निमित्ताने अनेक उपक्रम सुरू आहेत आणि ते भविष्यात काही दिवस चालणार आहेत. हा ताळेबंद प्रकाश पागे आणि प्रा. सुरेश मेहता या सनदी लेखापालांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम टप्प्यात आहे. पुढील कार्यवाही महामंडळ करणार आहे.असेही त्यांनी म्हटले आहे.

