लोणावळा | २३ सप्टेंबर २०२५
मावळ तालुक्यातील कार्ला परिसरातील प्राचीन आणि पवित्र असलेल्या एकविरा मातेच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी त्यांनी प्रसाद, साखर नैवेद्य आणि महावस्त्र अर्पण करून भाविकांसाठी सोयीसुविधा आणि सुरक्षिततेविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, वाहनतळाचा प्रश्न, खड्डेमय रस्ते आणि भाविकांच्या सोयीशी निगडित अनेक कामे अद्याप प्रलंबित आहेत. पीएमआरडीए आणि एमएमआरडीएने काही प्रमाणात लक्ष घातले असले तरी अधिक समन्वय साधून ही कामे वेगाने पूर्ण होणे गरजेचे आहे. दिवाळीनंतर विधानभवनात विशेष बैठक घेऊन संबंधित विभागांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यात येणार असून अनेक वर्षे थांबलेली कामे गतीमान करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार एकविरा देवी मंदिराच्या पायथ्याशी भाविकांसाठी सभा मंडप उभारण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या आमदार निधीतून १५ लाख रुपये देण्याची घोषणा केली. पीडब्ल्यूडीकडून ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ मिळताच या कामाला तातडीने सुरुवात होईल.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानातील तयारीचाही आढावा घेण्यात आला. पायरी मार्गावर रेलिंग बसविणे, मधमाशांच्या हल्ल्यापासून संरक्षण, लाकडी डोलीतून दर्शन घेणाऱ्या भक्तांची सुरक्षितता, आरोग्य सेवा सुविधा आणि पार्किंगच्या समस्येचे निराकरण यावर विशेष भर देण्यात आला.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “भाविकांची सुरक्षितता आणि सोय ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. एकविरा मातेकडे प्रार्थना करते की, सर्व ग्रामस्थ व भक्तांना सुरक्षितता, सौख्य, लक्ष्मी आणि विजय लाभो.”
या प्रसंगी डॉ. गोऱ्हे यांच्यासोबत भगिनी जेहलम जोशी, शिवसेना महिला आघाडी संपर्कप्रमुख कांताताई पांढरे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, जिल्हा संघटक अंकुश देशमुख, मावळ तालुकाप्रमुख राम सावंत, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, मावळ संघटक चंद्रकांत भोते तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन व सागर हुलावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

