पुणे : स्वारगेट परिसरात ‘दुधानी’ टोळीने दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे. मकोका कारवाईनंतर जामीनावर सुटून आलेल्या आरोपीसह सराईत गुन्हेगारांनी डायस प्लॉट परिसरात भर वस्तीत एकावर कोयत्याने वार करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाहीतर या टोळक्याने हवेत हत्यारे फिरवलीत त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भक्तिसिंग दुधानी, शक्तिसिंग दुधानी, गोविंदसिंग टाक, आकाशसिंग दुधानी यांच्यासह सात जणांविरोधात विविध कलमांन्वये ‘आर्म्स अॅक्ट आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. या प्रकरणी आबा सरोदे (वय ३९) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिलीय.शनिवारी रात्री तक्रारदार डायस प्लॉटमधील कॅनॉलजवळ उभे असताना आरोपींनी त्यांना गाठले. सुरुवातीला त्यांना हाताने मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर टोळक्याने कोयत्याने सपासप वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्ल्यानंतर परिसरात कोयते हवेत फिरवून आरोपींनी दहशत माजवलेली. अचानक झालेल्या या हल्ल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर आरोपी टोळके पसार झाले. सर्व आरोपींवर खुनाचा प्रयत्न, आर्म्स अॅक्टसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समजत आहे.गोविंदसिंग टाकवर ‘मकोका’ कारवाई झालेली असून, तो एप्रिल २०२५ मध्ये कारागृहातून बाहेर आला आहे. दुधानी टोळीतील सदस्यांवरदेखील खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तक्रारदारांशी आरोपींची केवळ तोंडओळख असून, जुन्या वादातून हल्ला झाल्याचा अंदाज आहे. घटनेनंतर पोलिसांनी छापेमारी करून परिसरात तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निकिता पवार करत आहेत.टोळक्यांवर ‘मकोका’सारखे कठोर कायदे लावले जात असले, तरी कारागृहातून बाहेर पडल्यानंतर ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळतात. टोळीतील गुंड गंभीर गुन्ह्यांसाठी अल्पवयीन मुलांना टोळीत सहभागी करून घेत असल्याचे समोर आले आहे.
स्वारगेट परिसरात ‘दुधानी’ टोळीचा हैदोस
Date:

