शाहीर हिंगे युवा कला गौरव पुरस्कार प्रदान
पुणे : आजची तरुण पिढी काही करत नाही, अशी केवळ ओरड करण्यापेक्षा या तरुण पिढीला योग्य दिशा दाखविण्याची गरज आहे. शाहिरी ही केवळ कला नाही तर महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा तरुणांच्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे, असे मत आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार युवाशाहीर अजिंक्य लिंगायत यांना कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे प्रदान करण्यात आला. यावेळी मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे, अभिनेते तेजस बर्वे, प्रा. संगीता मावळे उपस्थित होते.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, जोपर्यंत समाजामध्ये समस्या आहे, तोपर्यंत शाहिरी ही कला जिवंत राहणार आहे. आजही महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात शाहिरीच्या माध्यमातून अनेक जण समस्या मांडत आहेत. शाहिरी कला विविध माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास तरुणांपर्यंत पोहोचू शकेल.
डॉ. निवेदिता एकबोटे म्हणाल्या, शाहिरी कला आत्मसात करणे ही मोठी जबाबदारी आहे. या कलेच्या माध्यमातून केवळ स्वतःच्या सुखासाठी कला सादर करणे महत्त्वाचे नाही, तर या कलेच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक बदल कशा प्रकारे करू शकतो याची जाणीव कलाकारांना असते. त्यामुळे कलाकार हे केवळ कलाकार राहत नाही तर ते एक प्रकारे सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते असतात. आजच्या तरुणांना संस्कारक्षम करण्यासाठी शाहिरी अत्यंत उपयोगी आहे.
तेजस बर्वे म्हणाले, नवीन पिढीपर्यंत शाहिरी प्रशिक्षण मोफत पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य शाहीर हेमंतराजे मावळे हे आपल्या सहकाऱ्यांसह करत आहेत. केवळ त्यांच्या संस्थेसाठीच नव्हे तर समाजासाठी ही अत्यंत गौरवास्पद गोष्ट आहे. आजच्या तरुणांना योग्य दिशा दाखवण्यासाठी शाहिरीच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे हे निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.
प्रा. संगीता मावळे यांनी प्रास्ताविक केले. नंदिनी देवकर यांनी सूत्रसंचालन केले व सौ. प्रिती खोसे यादव यांनी आभार मानले. पुरस्कार वितरण समारंभानंतर स्वर्गीय रघुनाथराव कचरे स्मृती रुपये ११,०००/- (रुपये अकरा हजार) कलागौरव निधी प्रदान करण्यात आला, तसेच अजिंक्य लिंगायत यांचा शाहिरीचा कार्यक्रम झाला.

