पुणे :
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुना कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचे तीन जण स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीने जाहीर केलेल्या जागतिक दोन टक्के संशोधकांच्या या वर्षीच्या यादीत झळकले आहेत.प्राचार्य डॉ.आत्माराम पवार, उपप्राचार्य डॉ.वर्षा पोखरकर,डॉ.अमरजीतसिंग राजपूत यांचा या जागतिक यादीमध्ये समावेश झाला आहे. स्टॅनफर्ड विद्यापीठ दरवर्षी जगातील सर्वोत्तम २ टक्के शास्त्रज्ञांची यादी प्रसिद्ध करते, जी एल्सविअर (Elsevier) या प्रकाशन संस्थेच्या सहकार्याने तयार केली जाते.या यादीत २ लाखांहून अधिक शास्त्रज्ञांचा समावेश असून संशोधनावर आधारित प्रभाव, उद्धरणे आणि एच इंडेक्स(H-Index) यांचा विचार केला जातो. जॉन इओनिडिस व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या मानक पद्धतीने हे मूल्यांकन केले जाते आणि स्कोपस(Scopus) डेटाबेसचा आधार घेतला जातो.ही यादी संपूर्ण कारकिर्दीतील प्रभाव आणि एका वर्षातील कामगिरी या दोन भागांत प्रसिद्ध केली जाते.त्यामुळे या यादीतील समावेश हा सन्मान समजला जातो. या यशाबद्दल कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, संस्थेचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम ,कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी अभिनंदन केले.
नुकतेच भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे घटक असलेल्या पूना कॉलेज ऑफ फार्मसीने भारतातील फार्मसी संस्थांमध्ये राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) २०२५ मध्ये ३४ वे स्थान मिळवले आहे.महाविद्यालयlमध्ये ४५००० चौरस मीटर क्षेत्रफळाचा संशोधन विभाग आहे, जो अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय १६०० शोधनिबंध, १५ मंजूर पेटेंट्स, जवळपास २० औषध कंपन्यांसाठी सल्ला व प्रकल्प या महाविद्यालयातून पूर्ण केले आहेत. २१ कोटी रिसर्च ग्रँट या महाविद्यालयाच्या नावावर आहेत.महाविद्यालयास चौथ्या वेळा एनबी ए व नॅक द्वारे A++ ग्रेडसह मानांकन प्राप्त झाले आहे.

