पुणे-पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंटेलिजन्स विभागाने मोठी कारवाई करत सव्वा पाच किलो ड्रग्ज जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत दोन कोटी एकसष्ठ लाख रुपये इतकी आहे. मॅथा केलॉन नावाचे हे अमली पदार्थ परदेशातून पुण्यामध्ये आणले जात होते. इंटेलिजन्सच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.
अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे शोधण्यासाठी तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत. पुणे विमानतळावर झालेली ही कारवाई अमली पदार्थ विरोधी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमुळे आंतरराष्ट्रीय तस्करीच्या शक्यतांवरही तपास केला जात आहे. या घटनेमुळे अमली पदार्थ विरोधी पथकाची सतर्कता पुन्हा एकदा समोर आली आहे.एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी 18 सप्टेंबर 2025 रोजी बँकॉकहून एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट क्रमांक IX-241 वरून येणाऱ्या एका प्रवाशाची चेक-इन लगेज बॅगची बारकाईने तपासणी केली असता अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आली. प्रवाशाच्या बॅगमध्ये पावडर आणि क्रिस्टल स्वरूपात एकूण 5 किलो 234 ग्रॅम वजनाचा पांढरा पदार्थ आढळून आला.
फील्ड टेस्टिंग करण्यात आले असता हा पदार्थ मेथाकॅलोन असल्याचे निश्चित झाले.याची किंमत अंदाजे 2 कोटी 61 लाख रुपये इतकी आहे. एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ या प्रकरणाची नोंद घेतली आणि नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायदा, 1985 अंतर्गत प्रवाशाला अटक केली.

