पुणे: एकटेपणा, नैराश्य, भीती, चिंता, मानसिक भावनिक आघात अशा व मानसिक समस्यांवर बापू ट्रस्ट फॉर रिसर्च ऑन माइंड अँड डिस्कोर्स संस्था वस्ती पातळीवर काम करीत आहे, संस्थेच्या वतीने या सर्व मानसिक समस्यांवर जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बापू ट्रस्टकडून ‘सोशल मीडिया व मोबाईल व्यसन’ या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले. या सादरीकरणाने प्रेक्षकांना स्वतःच्या सवयींकडे नव्या नजरेने पाहण्याची आणि संतुलित जीवनशैली अंगीकारण्याची प्रेरणा दिली. यलो रिबन फेअरमध्ये बापू ट्रस्टच्या वतीने मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.
याबाबत बोलताना बापू ट्रस्टच्या ट्रस्टी सौ. सुमंगला कुमार म्हणाल्या, “एकट्या महिला, किशोरवयीन मुले-मुली, गर्भवती महिला, घरगुती हिंसाचाराचे बळी ठरलेल्या व्यक्ती, आणि मानसिक आघातातून गेलेल्या लोकांना बापू ट्रस्टचा मोठा आधार मिळाला आहे. ‘सेहर’ हा पर्वती व गोखलेनगर वस्त्यांमध्ये कार्यरत असलेल्या उपक्रमातून रोजच्या एकटेपणा, बहिष्कार आणि ताणतणावासारख्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. मानसिक आरोग्यसेवा म्हणजे केवळ औषधोपचार नसून नातेसंबंध जपत स्वतःची काळजी घेणे, समाजात सहभागी होणे, आणि व्यक्तींची सर्वसमावेशकता वाढवणे महत्वाचे आहे.”
“आज एकटेपणा सर्वत्र पसरलेली गंभीर समस्या आहे. सोशल मीडिया आणि मोबाईल व्यसनाचे मूळ कारण एकटेपणा असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. विशेषतः तरुणांमध्ये त्यामुळे नैराश्य व आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. तंत्रज्ञानामुळे आभासी नाती जोडणी वाढली असली तरी प्रत्यक्ष मानवी नात्यांची खोली आणि विश्वास कमी झाले आहेत. यावर उपाय करण्यासाठी केवळ वैद्यकीय किंवा मानसोपचार सेवा पुरेशा नाहीत. लोकांना पुन्हा जोडण्यासाठी आणि आपलेपणाची भावना परत मिळवण्यासाठी मजबूत मनोसामाजिक आधार यंत्रणा आवश्यक आहे,” असेही त्यांनी सांगितले.
गेल्या दशकापासून बापू ट्रस्ट यलो रिबन फेअरमधून मध्यमवर्गीय समाजापर्यंत पोहोचत आहे. या व्यासपीठावरून आम्ही खेळ, उपक्रम, पुस्तके, संवाद आणि प्रकाशनांद्वारे मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवतो, कलंकाला आव्हान देतो आणि खुलेपणाला प्रोत्साहन देतो. अधिक माहितीसाठी https://baputrust.com/ या वेबसाईट वर भेट द्या व मानसिक आधारासाठी bt.admfin09@gmail.com, 87679 73272 यावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

