त्रंबकेश्वर | पार्किंगच्या वादातून आज दिनांक २० सप्टेंबर रोजी त्रंबकेश्वर येथे तीन पत्रकारांवर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात किरण ताजणे गंभीर जखमी असून ते आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत, तर अभिजीत सोनवणे व योगेश खरे यांनाही दुखापत झाली आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर “खून करण्याचा प्रयत्न” यांसारख्या कठोर कलमांखाली गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली आहे.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या —
“पार्किंग कंत्राटांवरून वारंवार हिंसाचार घडतोय, ही चिंताजनक बाब आहे. या प्रक्रियेला पारदर्शक व नियमबद्ध करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.”
त्यांनी नाशिक पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची चौकशी आणि दोषींवर बीएनएस व पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
डॉ. गोऱ्हेंनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या घटनेची माहिती पाठवली असून, सरकार पत्रकार संरक्षण कायद्याच्या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करेल, असा विश्वास व्यक्त केला.

