धाराशिव -मराठा समाज देशभरात विखुरला आहे. सर्व राज्यांतील समाजाला संघटित करण्यासाठी दिल्ली येथे सकल मराठा समाजाचे अधिवेशन घेण्यात येणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
धाराशिव येथे जरांगे यांच्या उपस्थितीत बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात १०१ फुटी ध्वजस्तंभाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील बोलत होते. ते म्हणाले की, देशभरातील विविध प्रांतांमध्ये विखुरलेल्या मराठा समजाला एकत्र यावे म्हणून दिल्लीत अधिवेशन घेण्यात येणार आहे. यासाठी तेथे पाच ठिकाणी मैदानाची पाहणी झाली आहे.
भुजबळांकडून ब्लॅकमेलिंग
मंत्री छगन भुजबळ सरकारला ओबीसी नेते असल्याचे सांगत सातत्याने ब्लॅकमेल करत असतात. ही बाब मुख्यमंत्र्यांनी ध्यानात घेण्याची गरज आहे. भुजबळ यांनी हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आहे. यामुळे मराठ्यांनाही त्यांच्याप्रमाणे भूमिका घ्यावी लागणार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

