ग्रामस्थांना एअरलिफ्ट करण्याचे शिंदेंचे निर्देश
अहिल्यानगर | बीड- अहिल्यानगर जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि बीड जिल्ह्याच्या पश्चिम भागात रविवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांत पाणी शिरले असून ग्रामस्थ पुराच्या पाण्यात अडकले. बीड जिल्ह्यातील कडा येथे पूरस्थिती गंभीर बनल्याने लष्काराला पाचारण करण्यात आले आहे. पुरात अडकलेल्या अनेकांना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात पूर स्थिती गंभीर बनली आहे. कडा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावात पाणी शिरले असून, ग्रामस्थ जीव वाचवण्यासाठी इमारतींच्या छतावर चढले होते आणि मदतीची वाट पाहत होते. पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. लष्कराच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. स्थानिक आपत्ती निवारण पथकेही जेसीबी आणि इतर साधनांच्या सहाय्याने बचावकार्य करत आहेत. आतापर्यंत अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी झालेली नाही. मात्र, अनेक शेतकऱ्यांची जनावरे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दुपारी पाऊस थांबल्याने बचावकार्य वेगाने सुरू झाले आहे. लष्करी पथकाने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी, जवखेडे, तिसगाव आणि मढी या गावांना ढगफुटीसदृश पावसाचा मोठा फटका बसला आहे. पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विशेषतः करंजी आणि जवखेडे येथे सुमारे 70 ते 80 लोक पुरात अडकले होते, ज्यांना स्थानिक आणि आपत्ती निवारण पथकांनी सुरक्षित बाहेर काढले. करंजी गावातील प्रसिद्ध उत्तरेश्वर मंदिरालाही पुराचा वेढा बसला आहे. या भागातील ग्रामस्थांनी अनेक वर्षांनंतर असा पूर पाहिल्याचे सांगितले. अहिल्यानगर-जामखेड रस्त्यावरील सारोळाबद्धी येथील पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचबरोबर, कडा येथेही पूर आल्यामुळे नगर ते जामखेड वाहतूक थांबली होती, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पावसाचा आढावा घेतला. आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने त्यात 40 गावकरी अडकून पडले होते. त्यांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून काढावे लागेल, असे संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार नाशिक वरून हेलिकॉप्टर बोलवून या अडकलेल्या लोकांना तत्काळ एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्तांशी देखील त्यांनी या कक्षातून संवाद साधला.

