हवामान खात्याने पुढील तीन तास मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. पुढील ३ दिवस ईशान्येकडील राज्ये आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई आणि उपनगर परिसरात काल रात्रीपासूनच तुफान पावसाने जोर धरला असून आज पहाटेपासून त्याचा तीव्रतेने जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळे निर्माण झाले असून वाहनचालकांसाठी दृश्यमानता कमी झाली आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चाकरमान्यांसाठी घराबाहेर पडणे अवघड झाले असून ‘कामावर जायचे की नाही’ या संभ्रमात अनेकजण अडकले आहेत.
बीड तालुक्यातील नागझरी बेलखंडी बिंदुसरा नदीवर खूप पाणी आले आहे, दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे. या पावसाने आता बिंदुसरा नदी पात्रात पाणी आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
नागपुरात आज मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून, वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, हवामान विभागाने यापूर्वी नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला होता. आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरीत ढगफुटी सदृश्य पावस पडला आहे. मुसळधार पावसामुळे येथील दगडी नदीला पूर आल्याने उपकेंद्र, घरे आणि शेती पाण्याखाली गेली आहेत.

