
मुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी रात्री मुंबईला पोहोचले.आज त्यांनी लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले तत्पूर्वी, त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत धडकलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आढावा घेतला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे अवघ्या राज्याचे रान पेटले आहे. त्यातच मुंबईच्या दौऱ्यावर असताना शहा यांनी शनिवारी भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडून या आंदोलनाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी हे आंदोलन हाताळण्यासंदर्भात काही सूचना केल्याचीही माहिती आहे. शहांनी सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही या प्रकरणी चर्चा केली. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आता सरकारच्या पातळीवर वेगवान हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यासाठी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर पाचारण केले. यावेळी दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर या ठिकाणी सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे हे ही पोहोचले. शहा यांनी यावेळी शिंदे यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केल्याची माहिती आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या बैठकीत नेमके काय ठरले हे समोर आले नाही. पण आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावर व्यवहार्य तोडगा काढण्यासाठी वेगवान हालचाली होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे, या बैठकीनंतर अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या सरकारी बंगल्यावर जाऊन त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही होत्या. या दोघांनीही फडणवीसांच्या गणपतीची आरती केली. एकनाथ शिंदेही यावेळी आवर्जुन उपस्थित होते. त्यानंतर ते फडणवीस, शिंदे यांच्यासह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होते. उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. जरांगे यांनी वारंवार आपल्या समर्थकांना रहदारीस अडथळे निर्माण न करण्याचे आवाहन केले आहे. पण काही ठिकाणी व्यवस्थेच्या मुद्यावरून आंदोलकांचे पोलिसांसोबत खटके उडत असल्याचे चित्र आहे.


