केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी काल आसाममध्ये गुवाहाटी येथे राजभवनात ब्रह्मपुत्र विंगचे उद्घाटन केले आणि दूरस्थ पद्धतीने 322 कोटी रुपयांच्या आठ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.त्यानंतर अमित शाह काल रात्री २९ रोजी मुंबईच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. शहा काल रात्री ९:२०ला मुंबईत दाखल झाले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत केले.मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहावर ते मुक्कामी असतील. रात्री उशिरा ते मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बैठक घेणार आहेत, ही बैठक मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
गणेशोत्सवावर श्रद्धा असल्याने अमित शहा दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. यंदा 30 ऑगस्ट रोजी ते लालबागच्या राजाचं दर्शन घेतील. याव्यतिरिक्त, ते अंधेरी (पूर्व) येथील श्रीमोगरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाचं दर्शन घेतील.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा आंदोलक मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले आहेत. या आंदोलनामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रचंड ताण आलाय. याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यामुळे पोलिस यंत्रणेसमोर दुहेरी आव्हान आहे. शहा यांच्या दौऱ्यासाठी अतिरिक्त सुरक्षा कुमक तैनात करावी लागणार असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या भेटीदरम्यान, ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात रणनीतीवर चर्चा करणार आहेत. तसेच, आजपासून मनोज जरांगे पाटील यांनीही मुंबईत ठिय्या मांडला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मराठे मुंबईत दाखल झाले असून आता शहादेखील महाराष्ट्र दौऱ्यावर असल्याने नागरिकांना यावर काहीतरी तोडगा निघणार अशी अपेक्षा लागून आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा भाजपाच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. नवनिर्वाचित मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्याशी ते स्वतंत्रपणे संवाद साधणार आहेत. या बैठकीत मुंबईतील सध्याची राजकीय परिस्थिती, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळं महायुतीवर होणारे संभाव्य परिणाम, पक्षविस्ताराचं धोरण आणि निवडणुकीसाठी नवनिर्वाचित अध्यक्षांचं व्हिजन यावर सविस्तर चर्चा होणार आहे. याशिवाय, शाह हे इतर वरिष्ठ नेत्यांशीही संवाद साधणार आहेत, अशी माहिती भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं ‘ई-टीव्ही भारत’शी बोलताना दिली.

