पुणे:पुणे -सोलापूर रस्त्यावर मांजरी याठिकाणी कावेरी हॉटेलच्या समोरील बाजूस एका कार चालकानी पुण्याहून पाटसकडे जात असताना, रस्त्याच्या कडेला इंडिकेटर लावून कार उभी केली. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चार आरोपींनी कार बाजूला का घेतली ?या कारणावरून कारचालकाला बेदम मारहाण करत कारची तोडफोड केली.तसेच कारचालकाच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून नेण्याचा प्रकार घडला आहे .
याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात कुणाल कल्याणराव शितोळे (वय -35 ,राहणार – उरळी कांचन, तालुका -हवेली ,पुणे )यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे .त्यानुसार किरण फडतरे, सचिन चोरघडे ,सागर उर्फ नाना चोरघडे व त्याचे इतर चार साथीदार (सर्व राहणार -फुरसुंगी ,पुणे )याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कुणाल शितोळे व त्यांचा मित्र अविनाश मोरे हे एका कारमधून पुण्याहून पाटसकडे जात होते. त्यावेळी गाडी साईडला इंडिकेटर लावून उभी असताना, दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी ‘तू अचानक गाडी बाजूला का घेतली ‘असे म्हणून तक्रारदार यास हाताने मारहाण केली.त्यानंतर इतर आरोपींना घटनास्थळी बोलवून गाडीची दगडाने तोडफोड करून ,चालकाच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून दिली.तसेच तक्रारदार यास’ तू जर माझ्याविरुद्ध तक्रार केली तर, मी तुझ्याविरुद्ध चिठ्ठी लिहून आत्महत्या करील ‘अशी धमकी आरोपी किरण फडतरे यानी दिली.सदर घटनेनंतर तक्रारदार यांनी हडपसर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही दाभाडे करत आहे.

