पुणे -महापालिकेत सामाजिक कार्याच्या नावाने येणाऱ्या काही हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या व्यक्तींकडून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या असून महापालिकेत हे संबधित जणू ‘बाप ‘ असल्याचा आणि कायदेतज्ञ असल्याचा अविर्भाव आणून त्रासदायी वर्तन करत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत त्यामुळे एकीकडे अधिकारी तणावाखाली असताना दुसरीकडे प्रामाणिक माणूस , कार्यकर्ता देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडू लागले आहेत. या पार्श्वभूमीवरच महापालिकेच्या सुरक्षा विभागात काम करणारे प्रभारी सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी आपल्या पदावरून कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे.
खाते प्रमुख यांना पत्र लिहित आपल्याला आपल्या मूळ खात्यात परत पाठवावे, अशी मागणी विटकर यांनी केली आहे. सुरक्षा अधिकारी वर्ग-२ या पदांची डिपीसी (प्रमोशन कमिटी) ची बैठक पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे विटकर यांनी अशी मागणी केली आहे.विटकर यांनी लिहिलेल्या पत्रानुसार पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षा विभाग कार्यालयाकडे प्र. सुरक्षा अधिकारी पदावर माझी नेमणूक करण्यात आली होती. माझे वेतनाचे खाते उप आयुक्त, कर आकारणी कर संकलन येथे असून सदर ठिकाणी मी उप अधिक्षक म्हणून माझी नेमणूक आहे. गेली ३ वर्षे सुरक्षा विभागामध्ये प्र. सुरक्षा अधिकारी म्हणून प्रशासनाने माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे, सचोटीने आणि पुर्ण क्षमतेने पार पाडलेली आहे. तृतीय पंथीयाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता २५ तरूण-तरूणींना खाजगी सुरक्षा मध्ये नियुक्त करणेकामी तत्कालीन महापालिका आयुक्त यांच्या सहकार्याने हि जबाबदारी मी पार पाडलेली आहे. कंत्राटी कामगारांचे अनेक प्रश्न सोडविण्याची त्यामुळे मोठी संधी मिळाली तसेच कायम पदावर काम करणारे सुरक्षा रखवालदार आणि सेवानिवृत सुरक्षा रखवालदाराचे सुध्दा वेतन, भत्ते, सेवानिवृत्तीचे प्रकरणे यासारख्या प्रशासकीय कामामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या सोबत राहून काम केले आहे.
महानगरपालिकेच्या मुख्य भवनामध्ये येणारे मोर्च, आंदोलने, निषेध सभा, उपोषणे, धरणे बैठका च्या माध्यमातून विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनाशी सौजन्याने आणि उत्तम संमन्वय राखून प्रशासन आणि शिष्टमंडळ यांच्या मध्ये योग्य दुवा राखण्याचे काम सहाय्यक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा जमादार आणि इनचार्ज यांचेमार्फत केले आहे. पालखी बंदोबस्त, गणेशोत्सव बंदोबस्त तसेच विविध महामानवाच्या जंयती आणि पुण्यतिथी निमित्त तसेच विविध संभा-संमारभाना सुरक्षा बंदोबस्त तैनात करून सदैव उर्जात्मक काम करण्याचा प्रयत्न केला आहे.विटकर यांनी पुढे म्हटले आहे कि, महानगरपालिकेमध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून काम करीत असताना काही तथाकथित पत्रकार, यु टयुब चॅनलचे प्रमुख, माहिती अधिकारी कार्यकर्ते यांची विशिष्ट मागणी पुर्ण न केल्यामुळे तसेच खाजगी सुरक्षा एजन्सीचे प्रतिनिधी आणि त्यांचे हितचिंतक यांनी कंपनीला दंड केल्यामुळे नाराज होवून माझी शैक्षणिक अर्हता व शारीरीक क्षमता धारण करून पात्र यादीत क्रमांक १ वर नाव असताना सुध्दा वारंवार माझ्या उंची, शिक्षण, स्वभाव आणि वर्तन यावर आक्षेप घेवून समाजमाध्यमावर माझी प्रतिमा मलीन होईल असे आक्षेपार्ह माहिती टाकून मला बदनाम करणे, माझ्याबद्दल चुकीची माहिती प्रसारित करणे याबाबतची माहिती महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त, उप आयुक्त सामान्य प्रशासन यांच्याकडे माझ्याबाबत खोटी माहिती काल्पनिक माहिती देवून खोटया तक्रारी करणे, ब्लॅकमेल करणे, खोटया तक्रारीचे ई-मेल राज्य सरकारचे प्रतिनिधी यांना पाठविणे अशा प्रकारे प्रशासनाला वेठीस धरण्याचे काम वारंवार काही मंडळी दररोज करीत आहेत. त्यामुळे सुरक्षा अधिकारी वर्ग-२ या पदांची डिपीसी (प्रमोशन कमिटी) ची बैठक पुढे ढकलली जात आहे.
अशी वस्तुस्थिती निर्माण झाल्याने सुरक्षा अधिकारी पदाचे अत्यावश्यक सेवेतील कर्तव्य करताना मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे काम काही विशिष्ट मंडळी सुपारी घेवून करीत आहेत. त्यामुळे अशा वातावरणात महापालिका प्रशासन पाठीशी नसेल तर काम करणे माझ्यासारख्या अधिकाऱ्याला निश्चितच अवघड जात आहे. काही मंडळी मी या पदावर काम करू नये याकरिता वेगवेगळया प्रकारे आरोप करून प्रशासनात माझे विरूध्द चुकीचे सामाजिक जनमत तयार करीत असल्याचे दिसून येत आहे आणि प्रशासन देखील त्यामुळे हतबल झाल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे सुरक्षा अधिकारी पदावरून तातडीने मुक्त करण्यात यावे. माझे वेतनाचे मुळ खाते उप आयुक्त, कर आकारणी कर संकलन या विभागात काम करण्यासाठी रूजू होण्याकरिता कार्यमुक्त करून ही बाब आपल्या अभिप्रायासह वरिष्ठाना अवगत करावी. असे विटकर यांनी उपायुक्त यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

