पुणे – महापालिकेत २०१७ साली समाविष्ट झालेल्या साडेसतरानळी गावाला गेल्या आठ वर्षांतही पिण्याचे पाणी, रस्ते, वीज आणि आरोग्य सेवा या मूलभूत सुविधा अद्याप मिळालेल्या नाहीत. परिणामी ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने, तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.या वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर १३ जुलै २०२५ रोजी (रविवार), सकाळी ११ वाजता साडेसतरानळी चौकात लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आले असून संस्थापक अध्यक्ष अमोलनाना यशवंत तुपे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.असे कळविण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख तक्रारी:
अजूनही शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
रस्त्यांची अवस्था दयनीय, वाहतुकीस अडथळा.
वारंवार वीज खंडित होते.
आरोग्य सेवा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचा अभाव.
सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव; साथीचे आजार वाढत आहेत.
घरपट्टी व इतर कर नियमितपणे वसूल केले जात आहेत, पण सुविधा नाहीत.
अमोल तुपे यांनी इशारा दिला आहे की, “जर लवकरात लवकर प्रश्न सोडवले नाहीत, तर आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल, तसेच पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उपोषण करण्यास भाग पाडले जाईल.”गावातील नागरीक, महिला, शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार असून, संपूर्ण आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल, अशी माहिती आयोजक अमोल तुपे यांनी दिली.

