मुंबई-शिवसेना आमदार अपात्रता निकाल जाहीर होण्यासाठी काही वेळेचा अवधी राहिला असताना दुसरीकडे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाल्या होत्या.शिवसेना आमदार अपात्रता निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात नेमके त्याचे काय पडसाद उमटतील, यावर यावेळी काही आदेश देण्यात आल्याचे वृत्त आहे. मंगळवारी, रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची बैठक झाली होती. जवळपास तासभर ही बैठक सुरू होती.
आमदार अपात्रता निकाल सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निवास स्थान, शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय, आमदारांचे कार्यालय आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे.

