पुणे- भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी लोकांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद उफाळला आहे. मराठी माणसे आमच्या जीवावर जगतात, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी करताच, शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. वसंत मोरे यांनी निशिकांत दुबे यांना धमकी देताना निशिकांत दुबे यांना थेट बांबूच दाखवला आहे. आमच्याकडे पण अशा वाचाळवीरांसाठी बांबू, हातोडा असतात. याचा वापर आम्हाला करावा लागला, तर याला कारणीभूत दुबे सारखेच प्रतिनिधी असतील, असा दम देखील वसंत मोरे यांनी निशिकांत दुबे यांना दिला आहे.
वसंत मोरे म्हणाले, बाहेरच्या राज्यातून एसीमध्ये बसून अशी वादग्रस्त वक्तव्य केली जातात आणि त्याचा त्रास इथल्या लोकांना भोगावा लागतो. एवढाच माज असेल तर तुमच्या राज्यात जाऊन टॅक्स भरा, तिकडे जाऊन उद्योगधंदे करा. आमच्या मराठी माणसाचे उद्योग तुम्ही का घेता? असा सवालही वसंत मोरे यांनी विचारला.
एक्स वर पोस्ट करुन वायझेड करणे बंद करा, जर कुणाला भिडायचे असेल, तर महाराष्ट्रात यावे, आम्ही तयार आहोत आणि ते जर येणार असतील मारामारीला, तर आमच्याकडे बांबू आहेत. हे बांबू आम्हाला कुठे आणि कधी वापरायचे माहिती आहे, असा दमही त्यांनी दिला. आम्ही किती टॅक्स देतो हे निशिकांत दुबेने शिवसेना मनसेला न विचारता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले पाहिजे. ते म्हणतात की महाराष्ट्र नंबर वन आहे. मग तो नंबर वन हा बाहेरच्या लोकांमुळे आहे का? असा प्रश्नही वसंत मोरे यांनी केला आहे.
ठाकरे ब्रँड काय आहे हे त्यांना माहिती आहे. आतापर्यंत फक्त ट्रिझर दाखवला. जर पिक्चर पाहायचा असेल तर त्यांनी महाराष्ट्रात यावे, असे आव्हान वसंत मोरेंनी निशिकांत दुबे यांना दिले. निशिकांत दुबेने त्याच्या मुंबईतील त्याच्या नातेवाईकांना आधी विचारावे आणि मग अशी वक्तव्य करावी, असेही ते म्हणालेत.
बाहेरुन आलेल्या व्यावसायिकांनी इथे येऊन राजकारण करु नये. एकतर त्यांनी व्यापार करावा किंवा राजकारण करावे. त्यांना राजकारण करायचे असेल तर त्यांनी आधी केडियाला फोन करून विचारावे. निशिकांत दुबे हा भाजपचा खासदार असून त्यांची पिळावळ वाढली आहे. यांना प्रांतवाद करायचा आहे आणि राजकारण करायचे असल्याचा आरोपही वसंत मोरे यांनी केला आहे.

