
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे गुरुपौर्णिमा सप्ताहाचा शुभारंभ
पुणे : गुरुचरित्र म्हणजे केवळ ग्रंथ नाही तर संपूर्ण जीवनाचे मार्गदर्शन आहे. गुरु म्हणजे फक्त ग्रंथ शिकविणारा नाही, तर अंत:करण जागृत करणारा एक शक्तीस्त्रोत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास स्वामींनी दाखविलेली गुरुभक्ती हेच गुरुपौर्णिमेचे सार आहे, असे मत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदीच्या पहिल्या महिला विश्वस्त अॅड. डॉ. रोहिणी पवार यांनी व्यक्त केले.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमा सप्ताहाचा शुभारंभ श्री दत्त मंदिर प्रांगणात श्री दत्त कला मंच या उत्सव मंडपात झाला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, विश्वस्त सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे, अंजली काळकर आदी उपस्थित होते. उत्सवाचे यंदा १२८ वे वर्ष आहे.
बाल कल्याण संस्था पुणे च्या वतीने गंध फुलांचा गीतांचा हा दिव्यांग मुलांचा संगीतमय कार्यक्रम यावेळी सादर झाला. चैतन्य सिंदाळकर, साकेत देऊचके, सोनल कदम, श्लोक चावीर, श्रेयस जगदाळे, प्रकाश माळी, सिद्धी कुंजीर यांना संगीत शिक्षक दत्तात्रय भावे, वाद्य शिक्षक संजीव हेबाळे, गायन शिक्षक संकेत लोहकरे यांनी साथ दिली.
अॅड. डॉ. रोहिणी पवार म्हणाल्या, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण एक संकल्प करुया. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा, भक्ती आणि एकात्मितेचा संकल्प घेऊया. दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला चालत जातात, हेच विठ्ठलाच्या भक्तीसाठी गुरुसमर्पण आहे असेही त्यांनी सांगितले.
ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, हरवले आभाळ ज्यांचे हो त्यांचा सोबती या उक्ती प्रमाणे धार्मिक स्थळी समाजाकडून आलेल्या निधीतून धर्मसेवेसोबतच वंचितांच्या विकासासाठी समर्पण भाव जागृत ठेवणे हे सर्व विश्वस्तांचे सामुहिक कर्तव्य असायला हवे. त्यानुसार ट्रस्टचे सामाजिक कार्य अविरतपणे सुरु आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त शुक्रवार, दि ११ जुलै २०२५ पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सव काळात वैद्यकीय तसेच रक्तसंकलन शिबीरे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये आजच्या प्रथम दिवशी सदाशिव कुंदेन यांच्या सहकार्याने महा ब्लड सेंटरच्या सहाय्याने तीस बाटल्या रक्तसंकलन झाले.
श्री गुरु चरित्र पारायणासह सालाबाद प्रमाणे दररोज विविध भजनी मंडळाच्या भजन सेवा, कीर्तन, प्रवचन, समग्र गीता पठण, शास्त्रीय नृत्य, गायन, वादन, सुगम संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिर, मोफत वैद्यकीय सेवा, दैनंदिन अन्नदान सेवा असे अनेक सामाजिक उपक्रम या सप्ताहा दरम्यान संपन्न होत असतात. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले. कार्यकारी विश्वस्त अॅड. रजनी उकरंडे यांनी उपस्थितांचे स्वागत आणि विश्वस्त राजेंद्र बलकवडे यांनी प्रास्ताविक केले. कोषाध्यक्ष युवराज गाडवे यांनी आभार मानले.

