मुंबई-हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाले आहेत. एकीकडे या निर्णयाविरोधात राज ठाकरे यांनी 5 तारखेला मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी 7 तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. काहीही झाले तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही. तसेच त्रिभाषा सूत्रच आम्हाला मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता ज्या मुद्यावर या दोन्ही पक्षांची स्थापना झाली, त्या मराठीच्या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा हे दोन भाऊ एकत्र येणार का? अशीच चर्चा रंगली आहे. यातच राज ठाकरे यांनी या निर्णयाविरोधात 5 जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सात तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या मराठीच्या मुद्यावर हे दोन्ही भाऊ एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हिंदी सक्तीविरोधात 7 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी हुतात्मा स्मारक येथे आधी अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर एक मार्च आझाद मैदानापर्यंत जाईल. तिथेच धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मुंबईतील मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार, खेळाडू, साहित्यिक आणि सर्व पक्षातील मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवहान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षभेद विसरून अगदी भाजपमधील नेत्यांनी सुद्धा मराठी माणसासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारच्या हिंदीच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात येत्या 5 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या मोर्चात सर्वांनी पक्षीय राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी माझी भेट घेतली. त्यांनी त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांची भूमिका फेटाळून लावली. हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले असल्याचे राज यांनी म्हटले आहे. या प्रकरणी 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटी येथून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. या मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करेल, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
हिंदी सक्तीविरोधात ही आंदोलनाची सुरुवात असेल. एक-दोन आंदोलन करून हे थांबणार नाही. जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये हिंदी सक्ती करणार नाही, असे जाहीर केले, तर पाच मिनिटात हा विषय संपवू शकतो. मात्र हे दळण कशासाठी दळत आहात? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा भाजपने केली होती. मात्र आता ‘बांटेंगे आणि काटेंगे’ असे त्यांचे धोरण दिसत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. महाराष्ट्रात हिंदी चित्रपट देखील लोकप्रिय होतात आणि तुफान चालतात. हिंदी अभिनेते आणि अभिनेत्री देखील भरपूर पैसा मुंबईत राहून कमवत आहेत. भाजप नेते जे. पी. नड्डा हे एक विधान, एक देश, एक पक्ष, असे विधान करतात. हिंदीची सक्ती देखील त्यांच्या याच एकाधिकारशाही कडे वाटचालीसाठी सुरू असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आता ही भाषिक आणीबाणी भाजप लादत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचा विरोध आम्ही करणार आहे, असे देखील ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे गद्दार जे मिंदेपणाने त्यांच्यासोबत राहत आहेत, त्यांना देखील बाळासाहेब ठाकरे यांचे विचार काय? हे दाखवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

