पुणे/बारामती
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘नीलकंठेश्वर’ पॅनेलने पहिल्या फेरीअखेर निर्णायक आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत ‘ब’ वर्ग मतदारसंघ प्रवर्गातून स्वतः रिंगणात असलेले अजित पवार ९१ मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाले
त्यांचे प्रतिस्पर्धी भालचंद्र बापूराव देवकाते यांना केवळ १० मते मिळाली. विधानसभेच्या निवडणुकीनंतर बारामतीतील ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून त्यांनी माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात स्वतः जातीने प्रचार करत, गाठीभेटी घेतल्या होत्या आणि विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. त्यांच्या या सक्रिय सहभावाचा आणि रणनीतीचा प्रभाव मतदानाच्या आकडेवारीमध्ये स्पष्टपणे दिसून आला आहे. रात्री उशिरापर्यंत झालेल्या मतमोजणीत अजित पवारांचे स्वतःचे उमेदवार बहुसंख्य जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते.
रंजनकुमार तावरे यांना धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले आहे. ‘अजित पवार यांनी करुन दाखविले…’ या शब्दात कार्यकर्त्यांनी भावना बोलून दाखवली.
दुपारी दोन वाजेपर्यंत जाहीर झालेल्या सर्व जागांवर अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार विजयी झाले होते. पॅनेलच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्यानंतर प्रशासकीय भवन समोर जमलेल्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत व फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. एकच वादा अजितदादाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
दरम्यान या निवडणूकीसाठी भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास मतदारसंघातून नीलकंठेश्वर पॅनेलचे विलास ऋषीकांत देवकाते २१९४ मतांनी विजयी झाले. विलास देवकाते यांना ८९७२ तर विरोधी सहकार बचाव पॅनेलचे सूर्याजी देवकाते यांना ६५९८ मते मिळाली.
इतर मागासप्रवर्गातून नीलकंठेश्वरचे नितीन वामनराव शेंडे ११५३ मतांनी विजयी झाले. त्यांना ८४९४ तर सहकार बचाव पॅनेलचे रामचंद्र नाळे यांना ७३४१ मते मिळाली. महिला राखीव प्रवर्गात नीलकंठेश्वर पॅनेलच्या संगीता कोकरे व ज्योती मुलमुले यांनी सहकार बचाव पॅनेलच्या राजश्री कोकरे व सुमन गावडे यांचा पराभव केला.
संगीता कोकरे यांना ८४४० तर ज्योती मुलमुले यांना ७५७६ तर राजश्री कोकरे यांना ७४८५ व सुमन गावडे यांना ६०९९ मते मिळाली. दुपारी दोन वाजेपर्यंत एक दोन जागांचा अपवाद वगळता नीलकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार आघाडीवर होते.
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील नीलकंठेश्वर पॅनेलचे रतनकुमार भोसले हे १४८७ मतांनी विजयी झाले. त्यांनी सहकार बचाव पॅनेलच्या बापूराव गायकवाड यांचा पराभव केला. भोसले यांना ८६७० तर गायकवाड यांना ७१८३ मते मिळाली.
निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा, पाच वर्षे तुम्हाला राज्यातील पहिल्या पाच क्रमांकामधील भाव देतो असा शब्द दिला होता, मीच कारखान्याचा अध्यक्ष असेन असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यांच्या या आवाहनाला सभासदांनी साथ देत त्यांच्या पॅनेलला निर्विवाद बहुमत मिळवून दिले. यामुळे आता अजित पवार हेच माळेगावचे नवीन अध्यक्ष असतील हे देखील स्पष्ट झाले आहे.
मी जे बोलतो ते करुन दाखवतो, असे वारंवार भाषणात त्यांनी नमूद केले होते. त्या नुसार एक हाती निवडणूक लढवून दिग्गज समजल्या जाणाऱ्या चंद्रराव तावरे व रंजन तावरे जोडीला त्यांनी पराभवाची धूळ चारली.
आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहोत हे बाजूला ठेवत तब्बल आठवडाभर बारामतीत थांबून एक उमेदवार व पॅनेलप्रमुख या नात्याने वाडीवस्तीवर जात प्रचार करत नाराजी दूर करुन माळेगावची सत्ता त्यांनी अक्षरशः खेचून आणली.
निवडणूक जिंकण्यासाठी जे काही करावे लागते ते सर्व करत आपण मुत्सद्दी आहोत, सभासद देखील पाठीशी आहेत, हेच अजित पवार यांनी सिध्द करुन दाखविले. बारामतीत आजही त्यांचाच शब्द प्रमाण आहे, मतदारसंघातील संस्थावर त्यांची मजबूत पकड आहे हे या निमित्ताने पुढे आले.
नीलकंठेश्वर पॅनलचे विजयी उमेदवार
ब वर्ग
1) अजित पवार
भटक्या विमुक्त राखीव
2) श्री विलास देवकाते
अनुसूचित जाती राखीव
3) रतन कुमार भोसले
इतर मागासवर्ग राखीव
4) नितीन कुमार शेंडे
महिला राखीव
5) सौ संगीता कोक
6) सौ ज्योती मुलमुले
माळेगाव गट : 01
7) शिवराज जाधवराव
8) राजेंद्र बुरुंगले
9) बाळासाहेब तावरे
पणदारे गट : 2
10) योगेश जगताप
11) तानाजी कोकरे
12) स्वप्नील जगताप
सांगवी गट : 01
13) चंद्रराव तावरे

