गुरकुल आयोजित मैफलीत पंडित बृज नारायण यांचे सरोद वादन
पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत जगात श्रेष्ठ आहे. ऋतू आणि वेळेच्या प्रहराप्रमाणे शास्त्रीय संगीतातील राग बांधले गेले आहेत. अशी रागदारी जगातील कुठल्याही संगीतात नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध सरोद वादक पंडित बृज नारायण यांनी केले. शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारात रसिकांचेही मोठे योगदान आहे, असे मतही त्यांनी नोंदविले.
डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलतर्फे रविवारी (दि. 22 जून) जगविख्यात सारंगीवाद पंडित राम नारायण यांचे सुपुत्र व शिष्य पंडित बृज नारायण यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय सरोद वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जंगली महाराज रस्त्यावरील (छत्रपती संभाजी उद्यानासमोर) स्वरमयी गुरुकुल सभागृहात वादनाची मैफल रंगली. त्या वेळी पंडित बृज नारायण यांनी रसिकांशी संवाद साधला.
शास्त्रीय गायन, वादनाविषयी चर्चा व्हावी, अभ्यासकांना मार्गदर्शन व्हावे, कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने स्वरमयी गुरुकुलतर्फे मासिक संगीत सभेचे आयोजन करण्यात येत आहे. आजचे हे २५३वे पुष्प होते.
पंडित बृज नारायण यांनी आपल्या वादनाची सुरुवात रामकली रागाने केली. आलाप, जोड, झाला अप्रतिमरित्या सादर करून रसिकांना मोहित केले. राग अल्हैयाबिलावल सादर केल्यानंतर मैफलीची सांगता अप्रचलित भैरवीने केली. त्यांना पंडित अरविंदकुमार आझाद यांची तबला तर मनिषा पिंपळगावकर यांची तानपुरा साथ लाभली.
डॉ. प्रभा अत्रे यांच्याशी असलेल्या कौटुंबिक नात्याची उकल करून पंडित बृज नारायण म्हणाले, प्रभाताईंच्या गुरुकुलात वादनाची संधी मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे. सांगीतिक प्रवास उलगडताना ते म्हणाले, वडिल आणि गुरू तसेच ज्येष्ठ कलाकारांचे मिळालेले आशीर्वाद यामुळे संगीत क्षेत्रात यश प्राप्त करू शकलो. प्रत्येक वाद्याची भाषा ही वेगळी असते. सादरीकरणातून कलाकाराला आनंद मिळत असतो. शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार अधिक होणे ही काळाची गरज आहे.
कलाकारांचा सत्कार डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. अशोक वळसंगकर यांनी केला तर सूत्रसंचालन डॉ. अश्विनी वळसंगकर यांनी केले.

