पुणे – संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यात भव्य आणि आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ६१ फूट उंचीची श्री विठ्ठलाची भव्य प्रतिकृती व १६ फूट उंचीची तुळस, जी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या देखाव्याचे उद्घाटन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरचे अध्यक्ष ह.भ.प. श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते आणि यशोधा भिवाजी गदादे (पाटील) यांच्या शुभहस्ते भक्तिभावाने पार पडले. उद्घाटन सोहळ्याला विविध भजनी मंडळे, कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विशेष उपक्रमाबद्दल माहिती देताना प्रतिष्ठानचे शिवाजी गदादे पाटील यांनी सांगितले की, वारकरी संप्रदायाच्या श्रद्धा आणि भक्तीचा संदेश देणारा हा देखावा पुणेकरांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे. पंढरीच्या वारीचे महत्व अधोरेखित करणारा हा उपक्रम भाविकांना पावन अनुभूती देणारा ठरत आहे. वारकरी सेवा प्रतिष्ठाच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे याचा जास्तीत जास्त वारकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मा. नगरसेविका प्रिया गदादे व सामाजिक कार्यकर्ते प्रेम गदादे यांनी केले आहे.

