पुणे-यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेण्याचा अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा पवार कुटुंबियांना आहे का? या प्रश्नाचे उत्तर मिळणे गरजेचे आहे, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. तर मी नेहमी म्हणतो की अजित पवार हे कारखानदारांचे नेते आहेत. ही लुटारुंची टोळी आहे. यात सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे.लक्ष्मण हाके म्हणाले की, अजित पवारांकडून लोकशाहीचा खून पाडण्याचे काम होत आहे. ते राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांना केवळ माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत रस आहे. हे निवडणुका जिंकण्याचे अड्डे बनले आहेत. अजित पवार अर्थमंत्रीपदावर यासाठीच राहतात कारण ते राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकतात आणि यांच्या संस्थांना मोठे करतात.
लक्ष्मण हाके म्हणाले की, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत असाच गैरप्रकार झाला होता. अशाच रात्री-अपरात्री बँका उघड्या राज्याने पाहिल्या होत्या. जरी लोकं सात्यत्याने निवडून येतात ना ती जनभावनेवर नाही तर अशा काळ्याकृत्यावर निवडून येत असतात. हे पवार कुटुंब हे दरोडेखोरांची आणि कारखानदारांची टोळी आहे.लक्ष्मण हाके म्हणाले की, हा कारखाना जर ताब्यात ठेवला तर दर ठरवणे यांच्याच हातात राहते. मग त्या कारखान्यापासून जे काही रॉ मटेरियल मिळते ते यांच्या वायनरीला जाते. हा कारखाना जर यंदा पवार कुटुंबियांच्या ताब्यात गेला तर पुढल्या काळात तो खासगी कधी होईल आणि पवार कुटुंबियांच्या मालकीचा होईल हे कळणार नाही.
लक्ष्मण हाके म्हणाल की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एखाद्या कारखान्याच्या निवडणुकीत उभे राहणे अजित पवारांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. कारखान्यांना निधी देण्यास अर्थमंत्र्यांकडे पैसा आहे. मात्र, महाज्योतीच्या संशोधनात्मक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछत्रवृत्ती देण्यास यांच्याकडे निधी नाही, ही लाजिरवाणी बाबत आहे.

