पुणे-माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामतीचे राजकारण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘निळकंठेश्वर पॅनल’ आणि भाजप नेते चंद्रराव तावरे यांच्या ‘सहकार बचाव पॅनल’मध्ये थेट लढत आहे. या दोन्ही पॅनल एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. त्यात ‘सहकार सहकार बचाव पॅनल’ने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (पीडीसीसी) रात्री 11 वाजेपर्यंत बँक सुरू ठेवल्याचा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू असताना पीडीसीसी बँक बुधवारी रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली. त्यावेळी बँकेत माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदार याद्या आढळल्या. यावेळी अजित पवारांचे पीए सुनील मुसळे, व मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारीही तिथे आढळून आले. हे दोन्ही बँकेत का उपस्थित होते? व ही बँक रात्री उशिरापर्यंत का सुरू होती? असा सवाल चंद्रराव तावरे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी या बँकेच्या माध्यमातून मतदारांना पैशाचे वाटप होत असल्याचाही आरोप केला आहे.
सुनील मुसळे रात्री 11 वाजता बँकेत काय करत होते? ते आमच्यापुढे गाडीत बसून निघून गेले. बँकेत कारखान्याच्या सदस्यांची, त्याच्या नातेवाईकांची व जबाबदारी स्वीकारणाऱ्यांची यादी सापडली. इरिगेशनची अधिकारी डुबल यांचेही नाव यात आहे. त्यांनी पाणी वाटप संस्थांवर दबाव टाकून मदत करण्यास भाग पाडले, असे ते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप करताना म्हणाले.
दुसरीकडे, पीडीसीसी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक जगदाळे यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. बँक 5.30 वा. बंद होते. या अवधीनंतर फोन आल्यामुळे मी बँकेत आलो. संगणकीय काम सुरू असल्यामुळे काही कर्मचारी बँकेत उशिरापर्यंत थांबले होते. पण माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या बँकेत कशा आल्या? हे मला माहिती नाही. असे त्यांनी म्हटले आहे.
शरद पवार गटाच्या युगेंद्र पवारांनीही व्यक्त केला संताप
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेते युगेंद्र पवार यांनीही या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, बँकेची वेळ 5 वाजेपर्यंतची असते. त्यानंतरही ही बँक रात्री उशिरापर्यंत का सुरू होती? त्या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदारांच्या याद्या आढळल्यात. त्या याद्या तिथे कशा पोहोचल्या? सहकारी संस्था, शिक्षण संस्था याच्या याद्याही तिथे होत्या. बँकेचा लोड वाढला असावा. त्यामुळे ती रात्री 11 पर्यंत उघडी ठेवण्यात आली असावी. नजिकच्या काळात पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. हे राजकारण बदलले पाहिजे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

