मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. कम ऑन किल मी असं म्हणत आव्हान देणाऱ्या ठाकरेंना मरे हुए क्या मारना असा सवाल करत शिंदेंनी विचारला. विधानसभा निवडणुकीत मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला, असा खोचक टोला शिंदेंनी लगावला. मुंबईतील वरळी डोममध्ये आयोजित शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात एकसंध शिवसेना २०१४ आणि २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढली. त्यानंतर २०२४ मध्ये ठाकरेंच्या नेतृत्त्वात, शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षानं निवडणूक लढवली. याची आकडेवारी शिंदे यांनी मांडली आणि ठाकरेंवर शरसंधान साधलं. याचवेळी त्यांनी आपल्या पक्षाचा स्ट्राईक रेट आणि आकडेवारी सांगत आमचीच शिवसेना खरी असा दावा केला.
‘आणि म्हणून मी तुम्हाला थोडं गणित सांगतो. विधानसभेच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये काय झालं ते आपल्याला माहीत आहे. २०१४ मध्ये सेनेने २८२ जागा लढवल्या आणि ६३ जागा जिंकल्या. त्यावेळी स्ट्राईक रेट होता फक्त २२ टक्के. २०१९ साली शिवसेनेनं १२४ जागा लढवल्या आणि ५६ जागा जिंकल्या. त्यावेळी स्ट्राईक रेट होता ४५ टक्के,’ अशी आकडेवारी शिंदेंनी मांडली.

