सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे १३ व्या वार्षिक फॅशन शोचे आयोजन
पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एसआयएफटी), पुणे यांच्या वतीने १३वा वार्षिक फॅशन शो ‘ला क्लासे’ ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पस येथे मोठ्या उत्साहात झाला. ‘फ्युजन ऑफ कल्चर्स’ या संकल्पनेवर आधारित ‘एसआयएफटी’च्या विद्यार्थ्यांनी डिझाइन केलेल्या हटके पोशाखांचे सादरीकरण केले. कपड्यांच्या आकर्षक डिझाइन्स आणि मनमोहक रॅम्पवॉकने उपस्थितांची मने जिंकली. ‘सूर्यदत्त’च्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी मॉडेलिंग करत आपली आत्मविश्वासपूर्ण कला सादर केली.
फॅशन शोचे उद्घाटन ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा श्रीमती सुषमा चोरडिया, सह-उपाध्यक्षा श्रीमती स्नेहल नवलखा, ज्युरी सदस्य एस. एन. अंजली, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, महासंचालक डॉ. एस. रामचंद्रन, प्राचार्या डॉ. सायली पांडे आणि विभागप्रमुख पूजा विश्वकर्मा यांच्या उपस्थितीत झाले. ‘सूर्यदत्त’च्या सर्व शाखांचे प्राध्यापक, विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांनी सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एसआयएफटी) आयोजित भव्य ‘ला क्लासे’ फॅशन शोमध्ये उत्साहाने सहभाग घेत रॅम्पवर आत्मविश्वासाने आपली कला, कल्पकता आणि शैली सादर केली. या शोमध्ये परिधान केलेले सर्व कपड्यांचे डिझाइन्स ‘एसआयएफटी’च्या विद्यार्थ्यांनी केले होते.
भारतीय पुराणकथा आणि जागतिक लोककथांचा संगम, आदिवासी भारत आणि जागतिक स्ट्रीटवेअर यांचा मिलाफ, भारतीय सणांचे नव्या रूपात सादरीकरण, भारताची जागतिक स्तरावर भेट, बॉलीवूड आणि हॉलिवूड यांचा फ्युजन, राजघराण्याची परंपरा – एक जागतिक मिश्रण, परंपरागत हस्तकला – आधुनिकतेच्या रूपात या सात प्रकारे कलेचे सादरीकरण झाले. प्रत्येक कलेक्शनमागे संशोधन, सांस्कृतिक विविधतेचे सुंदर कथन आणि सर्जनशीलता यांचा सुरेख संगम दिसून आला. सूर्यदत्त पब्लिक स्कूलमधील वयोगट ५ ते ९ मधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात रॅम्पवर मनमोहक प्रस्तुती दिली. या भागाला प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व आनंद त्यांच्या पालकांच्या पाठिंब्याचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे प्रतिबिंब होते.
‘भारताची जागतिक स्तरावर भेट’ संकल्पनेला सर्वोत्कृष्ट संकल्पनेचा प्रथम पुरस्कार, तर ‘भारतीय पुराणकथा आणि जागतिक लोककथांचा संगम’ संकल्पनेला दुसरा क्रमांक मिळाला. सर्वोत्कृष्ट डिझाइनर म्हणून सोनल भोऱाडे, गौरी शेवाळे, वैश्नवी भांडारे, अंजली जीवणे, शुभांगी कराळे, पूर्णिमा कांबळे यांना गौरविण्यात आले. डॉ. सायली पांडे यांच्या संकल्पनेतून हा फॅशन शो साकारला.पूजा विश्वकर्मा आणि खुशबू गजबी यांनी फॅशन शोच्या यशस्वितेत मोलाची भूमिका बजावली. सहायक प्राध्यापक मोनिका कर्वे व शिखा शारदा यांनी प्रशिक्षण व कोरियोग्राफीचेही नेतृत्व केले. ग्रंथपाल छाया माने, क्रीडा संचालक शुभम शिंदे आणि प्रशिक्षण व प्लेसमेंट प्रमुख अखिला मुरमट्टी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अखिला मुरमट्टी व सूर्यदत्त विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कृष्णा यांनी केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्त शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देते. त्यामुळे त्यांना पाठ्यपुस्तकातील ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक शिक्षण देण्याला आम्ही प्राधान्य देतो. फॅशन टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कपड्यांचे कलाकुसरीचे काम, आकर्षक व संकल्पनेवर आधारित डिझाइन्स तयार करण्याचे आणि त्यांना परिधान करून रॅम्प वॉक करण्याच्या उद्देशाने गेल्या १३ वर्षांपासून ‘ला क्लासे’ वार्षिक फॅशन शोचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘ला क्लासे’ फॅशन शो महत्वाचा आहे.”

