मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदास संजय राऊत यांनी कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्यावर केलेला अघोरी पूजेचा आरोप सत्ताधारी शिवसेनेने जोरकसपणे फेटाळून लावला आहे. भरत गोगावले हे पूजापाठ करणारे आहेत. पण मातोश्रीचे बंगाली बाबा कनेक्शन काय आहे हे संजय राऊतांनी सांगावे. मातोश्रीवर रोज एका बंगाली बाबाचा वावर असतो. या बाबाच्या सूचनेनुसार उद्धव ठाकरे यांचे सर्वकाही ठरते, असे शिवसेना नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
सध्या भरत गोगावले यांचा एक अघोरी पूजा करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी वसंत मोरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. संजय राऊत यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. अघोरी विद्येमध्ये रममान असणारे मंत्री महाराष्ट्राचे काय भले करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. पत्रकारांनी याविषयी गुरूवारी संजय शिरसाट यांना छेडले असता त्यांनी गोगावलेंवरील टीका धुडकावून लावली. तसेच संजय राऊतांना मातोश्रीचे बंगाली बाबा कनेक्शन सांगण्याचे आव्हानही दिले.
संजय शिरसाट म्हणाले, व्हायरल व्हिडिओद्वारे भरतशेठ गोगावले हे पूजापाठ करणारे असल्याचे महाराष्ट्राला कळले. अघोरी पूजा अशी कॅमेऱ्यावर होत नाही. ती बंद खोलीत व जंगलात होते. हे मदारीचे खेळ बंद करावेत. टीका करणाऱ्या संजय राऊतांना हे कळले पाहिजे. त्यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा मातोश्रीचे बंगालीबाबा कनेक्शन काय आहे हे सांगावे. त्याची मीडियानेही माहिती घ्यावी. कारण, मातोश्रीवर रोज एका बंगालीबाबाचा वावर असतो. तो यांना काय करायचे आणि काय करायचे नाही हे सांगतो. आज-काल उद्धव ठाकरेही त्यांचेच फार ऐकतात. मातोश्रीचे बंगाली बाबा कनेक्शन काय हे शोधा.
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची काँग्रेस केली. त्यांना बाळासाहेबांच्या वक्तव्याचा विसर पडला. एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे वाटचाल करत आहेत. त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी रांगा लागल्या आहेत, असे ते म्हणाले.
संजय शिरसाट यांनी यावेळी उद्धव व राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही भाष्य केले. तसेच युतीसाठी आवश्यक असणारा संवाद या दोन भावांमध्ये नसल्याचा दावाही केला. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीवर आताच काही बोलणार नाहीत. कारण, त्यासाठी आवश्यक असणारा संवाद त्यांच्यात नाही. हिंदुत्व ही आमची विचारधारा आहे. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीतून भविष्यात काहीतरी सकारात्मक घडेल अशी आम्हाला आशा आहे, असेही संजय शिरसाट यावेळी बोलताना म्हणाले.

