शिंदेंवर दुसऱ्यांचा माल विकत घेऊन स्वतःचा पक्ष चालवण्याचा आरोप-बाजारात शिंदे गटाच्या दलालांचा सुळसुळाट
मुंबई-सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नपुंसक राजकारणी असल्याची जहरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यात स्वतःच्या पक्षातला किंवा स्वतःचा कार्यकर्ता निर्माण करण्याची ताकद नाही. ते नपुंसक राजकारणी आहेत, असे ते म्हणालेत. विनायक राऊत यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
शिवसेनेचा आज 59 वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटाचे दोन वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने होणार आहे. त्यातच काल उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या दोन नगरसेवकांनी आज शिंदे गटात जाण्याची घोषणा केली आहे. यामुळे संतापलेल्या विनायक राऊत यांनी गुरूवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांच्यावर उपरोक्त शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले, आमच्या 22 नगरसेवकानी उद्धव ठाकरे याना आपल्याला शिंदे गटाकडून वेगवेगळे आमिष दाखवले जात असल्याचे सांगितले. बाजारात शिंदे यांचे काही दलाल गिऱ्हाईक शोधत फिरत आहेत.
दुसऱ्याकडून माल विकत घ्यायचा आणि स्वतःचा पक्ष चालवयाचा असे त्यांचे काम सुरू आहे. आज शिंदे गटात जाणाऱ्या लोकांनी अगोदरच आपला निर्णय घेतला असेल. ते केवळ उद्धव ठाकरे काय बोलतात? हे पाहण्यासाठी त्यांच्या बैठकीला आले होते. ते शिंदे गटात जाणार हे आम्हाला यापूर्वीच समजले होते. शिंदे गटाच्या दलालांमध्ये मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. नीमेश रेवडेकर असे त्याचे नाव आहे. हा अधिकारी विविध नगरसेवकांच्या घरी जातो. त्यांच्या घरच्या मंडळींना फोन करतो. साहेब तुमच्या आयुष्याचे भले करणार असल्याचे सांगतो, असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे हे नपुंसक राजकारणी आहेत. त्यांच्यात स्वतःच्या पक्षातला, स्वतःचा कार्यकर्ता निर्माण करण्याची ताकद नाही. विकत घेतलेल्या लोकांच्या जीवावर पक्ष चालवता येत नाही. याऊलट उद्धव ठाकरे सर्वच माजी नगरसेवकांशी संवाद साधण्याचे काम करतात. ते शिंदेंसारखे कुणालाही कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवत नाहीत. आमचे दलालही बाजारात फिरत नाहीत. एक माजी नगरसेवक, एक विभाग प्रमुख आज जात आहे. आजचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेला आहे. शिंदे गटाच्या तुडतुड्यांचे आज केवळ नाटक आहे, असेही विनायकर राऊत यावेळी सत्ताधारी शिवसेनेवर शरसंधान साधताना म्हणाले.

