पुणे -महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला अधिकाऱ्याला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी भाजपच्या कामगार आघाडीचे पदाधिकारी ओंकार कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अखेरीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी कदम आणि काही साथीदारांना महापालिकेत प्रवेश बंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता . जो बेकायदा आणि आयुक्तांच्या अधिकारा बाहेरील असल्याचा आरोप होऊ लागला होता .जर कोणत्याही अधिकार्याला मारहाण, शिवीगाळ, धक्काबुकी झाली तर त्याबाबत पोलिसात तक्रार करण्याऐवजी त्याला आयुक्तांनी महापालिकेतच प्रवेश बंदी करणे हि कृती घटनाबाह्य असल्याचा आरोप होऊ लागला होता . ईद च्या दुसऱ्या दिवशी बागा अचानक बंद ठेवणे , नागरिकांना अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसात तक्रार न देता , न्यायव्यवस्थेकडे न्याय न मागता परस्पर प्रवेश बंदी ची शिक्षा सुनावणे अशा निर्णयामुळे महापालिका आयुक्त वादात सापडण्याची चिन्हे दिसत असताना अखेरीस कदम आणि साथीदारांच्या विरोधात उशिरा पोलिसात तक्रार नोंदविली गेली. जी ज्या त्या वेळेसच नोंदवली का गेली नाही असा सवाल आता यामुळे उपस्थित होणार आहे.
महिला अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ओंकार कदम, अक्षय कांबळे आणि त्यांचे साथीदार यांनी कोणतेही शासकीय काम नसताना आरोग्य विभागाच्या कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयीन सहकारी उपस्थित असताना त्यांनी अवमानस्पद टिप्पणी केली. त्यांनी अश्लील शब्दांचा वापर करून पाठलाग केला.
महिला अधिकाऱ्याने फिर्यादीत नमूद केले की, कदम आणि साथीदारांच्या कृत्यामुळे तिला मानसिक त्रास झाला आहे. आता तिला कार्यालयात जाण्यास भीती वाटत आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी ओंकार कदम आणि त्यांच्या साथीदारांना महापालिका भवन आणि महापालिकेशी संबंधित सर्व मिळकतींमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिस कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

