गर्भाशय काढण्याऐवजी गर्भाशयाची पुनर्रचना करण्याची दुर्मिळ आणि गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया
पुणे, — सह्याद्रि रुग्णालयातील डॉक्टरांना आफ्रिकेच्या कॅमेरुन देशातील ३६ वर्षीय महिलेवर यशस्वी आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करत तिचे गर्भाशय वाचवण्यात यश आले आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे मातृत्वसुखासाठी आसुसलेल्या या महिलेच्या गर्भारपणातील मोठा अडथळा दूर सरला आहे.
कॅमेरुन देशाची रहिवासी असलेली ग्लॅडीस ही व्यवसायाने शिक्षिका आहे. त्यांची पहिली गर्भधारणाही फार गुंतागुतीची होती. पहिल्या गर्भपातानंतर तिला जीवघेण्या परीस्थितीला सामोरे जावे लागले. पहिल्या गर्भधारणेदरम्यान त्यांची परिस्थिती खूपच नाजूक होती आणि गर्भाची पिशवी पाच वेळा साफ करावी लागली आणि त्यामुळे त्यांची गर्भाशयाच्या आतील पडद्याची म्हणजेच एंडोमेट्रियम ची जाडी खूपच कमी झाली.
त्यानंतरच्या गर्भारपणात दुस-या तिमाहीत तिने आपले मूल परत एकदा गमावले. या गर्भपातानंतर गर्भातील बाळाची वार म्हणजेच प्लेसेंटाचा एक भाग गर्भाशयातच राहिला. वैद्यकीयय भाषेत या स्थितीला रिटेन्ड प्लेसेंटा असे म्हणतात. ही वार राहिल्याने महिलेला फारच रक्तस्त्राव झाला, ज्याला ‘गर्भपातानंतरचा रक्तस्त्राव’ असे संबोधले जाते. पहिल्या गर्भधारणेमध्ये निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे या महिलेच्या दुस-या गर्भधारणेतही समस्या निर्माण झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
कॅमेरुन येथे उपचारादरम्यान तिच्या गर्भाशयात गर्भनाळेचा एक भाग आतच राहिला होता. तो काढून टाकण्यासाठी डॉक्टरांनी तीनदा प्रयत्न केले, मात्र प्रत्येक वेळी तीव्र रक्तस्त्राव झाला आणि तिला अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करावे लागले. या शस्त्रक्रियांदरम्यान ती गंभीर अवस्थेत होती आणि त्यामुळे तिला एकूण तब्बल २२ वेळा रक्त चढवावे लागले. सततच्या दोन गर्भपातांमुळे ग्लॅडीस यांना प्रचंड शारिरीक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. अखेर तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तिला गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला. भारतात सह्याद्रि रुग्णालयात येण्याआधी, मध्यपूर्व देश, फ्रान्स आणि आफ्रिकेतील अनेक डॉक्टरांनीही तिला गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला. इतकंच नाही तर भारतात दिल्ली आणि इतर अनेक शहरांतील काही रुग्णालयांमध्येही तिला गर्भाशय काढण्याचाच सल्ला देण्यात आला होता.
परंतु मातृत्वाला आसुसलेल्या ग्लॅडीस यांनी गर्भाशय काढून टाकण्याच्या निर्णयाला ठाम विरोध दर्शवला. आपली प्रजननक्षमता जपण्यासाठी त्यांनी पुढचे उपचार भारतात घेण्याचे ठरवले. पुण्यातील सह्याद्रि रुग्णालयाच्या शिवाजीनगर येथील मॉमस्टोरी विभागाच्या प्रसूती-स्त्रीरोगतज्ज्ञ आणि आयव्हीएफ विभागाच्या संचालिका डॉ. सुप्रिया पुराणिक यांच्याशी सल्लामसलत केली. डॉ. सुप्रिया पुराणिक यांचा स्त्रीरोगविषयातील गुंतागुंतीची आव्हानात्मक प्रकरणे हाताळण्यात प्रसिद्ध आहेत. चर्चेअंती डॉ. पुराणिक आणि त्यांच्या टीमने हे आव्हान घेण्याचे ठरवले आणि १९ एप्रिल रोजी या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्यामध्ये खालील प्रक्रियांचा समावेश होता.
० लॅपारोटॉमी आणि अधेसिओलिसिस (आतड्यांचे गुंता सोडवणे) – पोटाच्या आतील भागातील तसेच वेगवेगळ्या अवयवांमधील समस्यांच्या निराकरण्यासाठी लॅपोरोटॉमी आणि अधेसिओलिसिस ही शस्त्रक्रिया केली जाते. डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेच्या मदतीने या महिला रुग्णाच्या शरीराच्या आतील जखमा किंवा गाठी काढून टाकल्या.
० बायलॅटरल इंटर्नल इलियाक अँड यूटेरीन आर्टरी लीगेशन – ही एक अशी प्रक्रिया होती ज्यामध्ये गर्भाशयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या बांधल्या गेल्या, जेणेकरून शस्त्रक्रियेदरम्यान होणारा रक्तस्त्राव कमी करता येईल. या पद्धतीमुळे रक्तस्त्राव लक्षणीयरीत्या कमी झाला.
० हिस्टरोटॉमी – गर्भाशयात अडकलेले ऊतक काढण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. यात गर्भाशयाला छेद देण्यात आला. परिणामी, महिलेच्या शरीरात संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत झाली.
० मायोमेक्टॉमी – गर्भाशयातील गाठी काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे गर्भाशयाच्या कार्यक्षमतेत सुधारणा झाली.
भविष्यात गर्भधारणा झाल्यानंतर यशस्वी प्रसूतीनंतर निरोगी बाळ जन्माला यावे, आणि गर्भाशयाच्या कमजोरीमुळे होणा-या भविष्यातील गर्भपातांना टाळता यावे यासाठी डॉक्टरांनी रुग्णाच्या गर्भाशयाच्या मुखाला सर्जिकल टाके घातले. यावेळी महिलेच्या गर्भाशयाचे पुनर्रचनाही करण्यात आले. या शस्रक्रियेमुळे महिलेला इतर महिलांप्रमाणे सामान्य गर्भाशय मिळाले. यासह, गर्भधारणेसाठी आवश्यक असणारे शारिरीक घटकही पुनस्थापित झाले.
डॉ. सुप्रिया पुराणिक यांनी सांगितले, ‘‘ही केस माझ्या करिअरमधील एक आव्हानात्मक केस होती. यापूर्वी रुग्णाच्या अनेक शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्या होत्या. शरीरातील रक्तवाहिन्यांची विचित्र जुळवणी, गर्भाशयातील आतल्या बाजूला असलेली प्लेसेंटा अक्रेटा त्यामुळे होणार अनियंत्रित रक्तस्त्राव – या सगळ्यामुळे गर्भाशयाला मोठे नुकसान होण्याची भीती होती. तरीही ग्लॅडीसला मातृसुख देण्यासाठी आम्ही दृढनिश्चयी होतो. आता, ग्लॅडीस यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्यांची तब्येत स्थिर आहे. मातृत्वसुख अनुभवता येणार असल्याने त्यांनी सह्याद्रिच्या डॉक्टरांना धन्यवाद दिले. सर्व कठिण परिस्थितीवर मात करत प्रत्येक महिलेचे आई बनण्याचे स्वप्न आम्हांला मॉमस्टोरीतून पूर्ण करायचे आहे. आमच्यासाठी ही घटना मेडिकल केसपेक्षाही जास्त महत्त्वाची होती. धैर्य, जिद्द आणि जगाला नवी आशा देण्याची ही कथा आहे,’’ या शब्दांत डॉ. पुराणिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.