पुणे : कलाकाराने कलेतून आनंद घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक कलाकाराला समान संधी उपलब्ध होऊ शकत नाही, अशा परिस्थितीत कलाकाराने कलेला पूरक रंगभूषा, वेशभूषा, तांत्रिक बाबी, रंगमंच व्यवस्थापन, प्रकाश योजना यांचा अर्थार्जनासाठी सहाय्यक म्हणून विचार करण्यास हकरत नाही, परंतु हे करत असताना स्वत:च्या रियाजाकडे दुर्लक्ष करता कामा नये. यासाठी वेळेचे सुयोग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन कथक नृत्यगुरू शमा भाटे यांनी केले.
‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट’ या उपक्रमाअंतर्गत ‘कला आणि करिअर’ विषयावरील चर्चासत्राचे भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्तर्फे आज (दि. 13) बालगंधर्व कलादालनात आयोजन करण्यात आले होते. यात ‘नृत्य कला आणि करियर’ या विषयावर नृत्यगुरू शमा भाटे, भरतनाट्यम नृत्यगुरू स्मिता महाजन यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्याशी भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्चे संचालक प्रा. शारंगधर साठे आणि भारती विद्यापीठातील नृत्यविभाग प्रमुख देविका बोरकर यांनी संवाद साधला.
स्मिता महाजन म्हणाल्या, आजच्या काळात विद्यार्थ्यांच्या कलेच्या क्षेत्राकडे ओढा वाढताना दिसत आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे योग्य मूल्यमापन, सर्वसमावेशक अभ्यासक्रम, वर्गीकरण याविषयी विचार होत आहेत. आज ज्ञानाच्या कक्षा विस्तारत असताना कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी रंगभूषा, वेशभूषा, वाद्य, संगीत, शरीरशास्त्र, संवाद कौशल्य यांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. कलाकाराने सर्जनशील असण्याबरोबरच स्वयंप्रेरणेने नवनिर्मिती करणे गरजेचे असून स्वआनंदासाठी कला शिकावी व शिकवावी.
आसाममधील सत्रिय नृत्यकलेविषयी अवगत करून देविका बोरठाकूर म्हणाल्या, सत्रिय हा कलाप्रकार महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे. त्या पुढे म्हणाल्या, कलाकाराच्या सादरीकरणातून रसिक नेहमी शाश्वत शांतीची अपेक्षा करीत असतो, जी देण्यासाठी आम्ही कलाकार कटिबद्ध राहतो.

