सारसबाग मुस्लिम नागरिकांसाठी ईदच्या दुसऱ्या दिवशी बंद? – आयुक्तांकडे कायदेशीर कारवाईची मागणी
पुणे : बकरी ईदनंतरच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील सारसबाग सार्वजनिक उद्यान मुस्लिम धर्मीय नागरिकांसाठी मुद्दाम बंद ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन युवा मोर्चाने केला आहे. यासंदर्भात मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देऊन उद्यान विभाग प्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
डंबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक ८ जून २०२५ रोजी, बकरी ईदनंतरच्या दुसऱ्या दिवशी, मुस्लिम समाजातील नागरिक उद्यानात येतील या शक्यतेवरून धार्मिक ध्रुवीकरणाच्या भूमिकेतून सारसबाग उद्यान बंद ठेवण्यात आले. ही कृती भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्ष मूल्यांना सुरुंग लावणारी असून, सार्वजनिक ठिकाणी धार्मिक भेदभाव करून नागरिकांचा प्रवेश रोखण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.
या घटनेमुळे मुस्लिम समाजात नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून, पुणे महानगरपालिकेच्या या निर्णयाविरोधात विविध संघटनांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. रिपब्लिकन युवा मोर्चाने या प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणावर पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, उद्यान सार्वजनिक असल्याने कोणत्याही धर्माच्या नागरिकांना प्रवेश नाकारणे हा घोर अन्याय असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
नेमके निवेदनात काय म्हटले आहे …

मा. नवल किशोर राम (भा.प्र.से)
आयुक्त,
पुणे महानगरपालिका, पुणे
यांसी सविनय सादर
विषय – धार्मिक ध्रुवीकरणातून मुस्लिम धर्मियांना प्रवेश नाकारण्यासाठी सार्वजनिक उद्यान बंद केलेप्रकरणी कायदेशीर कारवाई करणेबाबत.
मा. महोदय,
धार्मिक ध्रुवीकरणातून मुस्लिम धर्मियांना प्रवेश नाकारण्यासाठी आपले पुणे महानगरपालिकेचे सारसबाग उद्यान बंद केलेप्रकरणी उद्यान विभाग प्रमुख व इतर जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणेबाबतची विनंती आपणाकडे करण्यात येत आहे.
मा. महोदय, शनिवार दिनांक ०७/६/२०२५ रोजी साजऱ्या झालेल्या बकरी ईद नंतर दुसरे दिवशी म्हणजेच रविवार दिनांक ८/६/२०२५ रोजी आपले वर नमुद सारसबाग उद्यान मुस्लिम समाजातील लोक उद्यानात येतील ही बाब गृहित धरुन धार्मिक भेदभाव आधारित इराद्याने बंद करणेत आली होती.
सदर बाब ही अत्यंत गंभीर व भारतीय संविधानाला धोका निर्माण करणारी असल्याने सदर प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी ही विनंती आम्ही आपणाकडे करीत आहोत.
कळावे
पुणे महानगरपालिका
महापालिका आयुक्त कार्यालय
शिवाजीनगर, पुणे-४११००५
दिनांक १०/६/२५
आपला विश्वासू,
राहूल डंबाळे
(अध्यक्ष, रिपब्लिकन युवा मोर्चा)
ऑफिस नं. 7, ग्राफिकॉन आर्केड, ससुन रोड, जहाँगीर हॉस्पीटल समोर, पुणे-1
Office No. 7, Graficon Arcade, Sasoon Road. Opp. Jahangir Hospital, Pune – 01
Mob.: +91 9822 917 119 Email: dambalerahul@gmail.com

